शहरातील मारवाडी युवा मंचतर्फे घरामध्येच कोरोनावर उपचार घेणाऱ्या (होम काॅरंटाईन) आणि प्रामुख्याने एकटे असणाऱ्या किंवा वृद्धांसाठी सुरू करण्यात आलेल्या शहरासाठी मर्यादीत अत्यंत अल्प दरात घरपोच सकस भोजन देण्याच्या योजनेची पोलीस उपायुक्त डॉ विक्रम आमटे यांनी प्रशंसा केली आहे.
पोलीस उपायुक्त डॉ विक्रम आमटे यांनी आज बुधवारी मारवाडी युवा मंचच्या घरपोच सकस भोजन योजनेच्या ठिकाणी भेट देऊन तेथील कामकाज आणि योजनेची माहिती जाणून घेतली. सदर योजनेबद्दल प्रशंसोद्गार काढून पोलीस उपायुक्तांनी असेच चांगले कार्य करत रहा आणि कांही गरज भासल्यास निसंकोच सांगा.
पोलीस प्रशासनाकडून तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळेल, असे सांगितले. याप्रसंगी गोपाळ उपाध्ये, रवी राजपुरोहित, कमलेश राजपुरोहित, अजय हेडा, अनिल नवाल आदींसह मारवाडी युवा मंचचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
सदर घरपोच सकस भोजन योजनेअंतर्गत होम काॅरंटाईन झालेल्या विशेष करून एकट्या-दुकट्या रुग्णांसह वयोवृद्ध रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना अवघ्या 50 रुपये इतक्या माफक दरात दुपार आणि सायंकाळ अशी दोन वेळची जेवणाची थाळी घरपोच उपलब्ध केली जात आहे.
कोरोना तज्ञ डॉ. माधव प्रभू यांच्या मार्गदर्शनानुसार कोरोनाग्रस्तांना पोषक असा आहार या योजनेअंतर्गत दिला जात असून गेल्या जवळपास पंधरा दिवसात 1100 जणांना जेवणाचे डबे पोहोचविण्यात आले आहेत.
सदर योजने अंतर्गत 7 दिवसांचे काॅरंटाईन जेवण पॅकेजही उपलब्ध आहे. तेंव्हा इच्छुकांनी अधिक माहिती तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी सायंकाळी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत 9833069306 किंवा 7090710710 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मारवाडी युवा मंच बेळगावतर्फे करण्यात आले आहे.