Wednesday, December 25, 2024

/

बोगस डॉक्टरमुळे खानापूर तालुक्यात ब्लॅक फंगसचा बळी?

 belgaum

खानापूर तालुक्यात बोगस डॉक्टरांची चलती झाली आहे आणि अशा डॉक्टरांपैकी एकाने स्टेरॉईडचा ज्यादा डोस दिल्यामुळे ब्लॅक फंगस होऊन तालुक्यातील एकाचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. तेंव्हा प्रशासनाने या प्रकरणी तात्काळ लक्ष घालून बोगस डॉक्टरांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार खानापूर तालुक्यातील बेकवाड गावातील एका 40 वर्षीय इसमाला कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाचे निदान झाल्यानंतर शेजारील गावातील एका डॉक्टराकडून सदर इसमावर 15 -20 दिवस घरांमध्येच उपचार सुरू होते. मात्र प्रकृती सुधारणे ऐवजी ती अधिकच बिघडू लागल्याने त्याला बेळगाव येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी सदर इसमाला ब्लॅक फंगस झाल्याचे सांगून बेळगावात सध्या त्यावर उपचार उपलब्ध नसल्याने त्याला कोल्हापूरला घेऊन जाण्यास सांगितले. कोल्हापूर येथील हॉस्पिटलमध्ये मेंदूपर्यंत पोहोचलेल्या सिव्हीयर ब्लॅक फंगसमुळे संबंधित इसमाचा गेल्या शनिवारी उपचाराचा फायदा न होता मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, बेकवाड येथील कोरोनावर उपचार घेणाऱ्या त्या इसमाच्या मृत्यूस खानापुरातील संबंधित डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. कारण त्याने दिलेल्या स्टेरॉइडच्या इंजेक्शनमुळेच रक्तातील साखर वाढवून संबंधित इसमाला ब्लॅक फंगस झाल्याचे समजते. खानापूर तालुक्यात अलीकडे बोगस डॉक्टरांची चलती आहे.

राजकीय वरदहस्त लाभलेले बोगस डॉक्टर ग्रामीण भागात आपली दुकाने थाटून बसले आहेत. गावातील रुग्ण उपचारासाठी बेळगाव अथवा खानापूरला जाण्याचे श्रम घेण्याऐवजी गावातील डॉक्टरकडे उपचार घेतात. रुग्णाची तब्येत अधिकच बिघडली की मग शहरातील डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला जातो.

त्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत बहुतांश रुग्ण श्वसनाच्या त्रासामुळे दगावल्याची उदाहरणे आहेत. कोणत्याही प्रकारची डॉक्टरी पदवी नसताना नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे हा गुन्हा आहे. तेंव्हा प्रशासनाने या प्रकरणी तात्काळ लक्ष घालून बोगस डॉक्टरांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.