बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक दरम्यान बदली झालेले पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी पुन्हा एपीएमसी पोलीस स्थानकात रुजू झाले असून पदभार स्वीकारताच ते झपाट्याने लॉक डाऊनच्या कामाला लागले आहेत. त्यांच्या पुढाकाराने कोरोना प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर उद्या मंगळवार दि. 11 मेपासून सलग 6 दिवस कंग्राळी खुर्द गाव ‘बंद’ ठेवण्याचा स्तुत्य निर्णय घेण्यात आला आहे.
लाॅक डाऊन व कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एपीएमसी मार्केट यार्ड पोलीस स्टेशन आणि कंग्राळी खुर्द ग्रामपंचायत यांनी संयुक्तरीत्या उद्या मंगळवार दि 11 मेपासून 16 मेपर्यंत संपूर्ण कंग्राळी खुर्द गाव बंदचा निर्णय घेतला आहे. तसेच लाॅक डाऊनच्या बाकीच्या दिवसांसाठी पुढील नियम लागू करण्यात आले आहेत. कंग्राळी खुर्द गावातील सर्व नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये. गावामध्ये विनामास्क व कारण नसताना दुचाकी घेऊन किंवा चारचाकी घेऊन फिरल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. कांही महत्वाचे काम असल्यास सकाळी 6 ते 9 या वेळेत करून घ्यावे.
मुख्य रस्त्यावर कोणीही भाजीपाला विकायला बसु नये. भाजीपाला विकायचा असल्यास एका ठिकाणी न बसता तो फिरून विकणे. एका ठिकाणी बसून विकल्यास 1000 दंड आकारण्यात येईल. किराणी साहित्य पाहिजे असल्यास सकाळी 6 ते 9 या कालावधीतच घ्यावे. दुकानाबाहेर कोणीही गर्दी करू नये आपल्या साहीत्याची यादी दुकानदाराकडे देऊन नंतर साहीत्य घेऊन जाणे. यादी खाली आपला मोबाईल नंबर नमूद करणे. कोणत्याही दुकानदाराने कोरोना संदर्भातील नियमांचे उल्लंघन करून साहित्याची विक्री केल्यास 5000 रुपये दंड ठोठावण्यात येईल.
सहा दिवस गावातील चिकन व मटण दुकान पूर्णपणे बंद राहतील एखाद्या वेळी दुकान चालू केल्यास किंवा आतून बंद करून विक्री केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी मराठी शाळा कन्नड शाळा मंदिरे खुल्या जागेत किंवा गल्लीच्या कोपऱ्यावर( घोळका) एकत्र करून बसल्या 1000 दंड घेण्यात येईल. दूध विकणारे व शेतातील भाजीपाला भाजी मार्केटला घेऊन जाणारे यांना फक्त गावाबाहेर जाता येणार.
सदर नियम मोडणाऱ्या संबंधितावर कडक कारवाई करण्यात येईल. व पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येईल.असा इशारा ग्रामपंचायत कंग्राळी खुर्द व मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्यावतीने देण्यात आला आहे.
तसेच कोरोनाचा धोका लक्षात घेऊन घरी रहा, सुरक्षित रहा, असे आवाहनही करण्यात आले आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी जनहितार्थ उपक्रम राबवण्यात नेहमीच आघाडीवर असतात. आता पुन्हा एपीएमसी मार्केट यार्ड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक म्हणून रुजू होऊन पदभार स्वीकारताच लाॅक डाऊन यशस्वी करण्यासाठी या पद्धतीने ‘गाव बंद’ चा स्तुत्य उपक्रम राबविल्याने मुशाफिरी यांची प्रशंसा होताना दिसत आहे.