कोरोना संसर्गमध्ये झालेली चिंताजनक वाढ पाहता येत्या संपूर्ण जून महिन्यात राज्यात लाॅक डाऊन जारी केला जाण्याची दाट शक्यता आहे. राज्याचे गृह, कायदा व संसदीय व्यवहार खात्याचे मंत्री बसवराज बोम्माई यांनी तसे संकेत दिले आहेत.
बेंगलोर येथे शनिवारी आपल्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी बोलताना गृहमंत्री बोम्माई म्हणाले, केंद्र सरकार व केंद्रीय गृह खात्याने कोरोनाला रोखण्यासाठी 30 जूनपर्यंत कडक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या सूचनेनुसार काय उपाय योजना करायच्या या संदर्भात मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा सर्व मंत्र्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर करतील. राज्यात कोरोनाचा संसर्ग अद्याप कमी झालेला नाही. संक्रमिताःची संख्या आणि बळींची संख्या घटली तरच कोरोना नियंत्रणात आला असे म्हणता येईल असा अभिप्राय तज्ञांनी दिला दिला आहे, असे बोम्माई म्हणाले.
केंद्र सरकारने जीएसटीची 11 हजार कोटी रक्कम राज्याला द्यायची आहे. काल झालेल्या बैठकीत ती देण्याची मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यात राज्यात मोठी आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे. लाॅक डाऊनमुळे निर्माण झालेली आर्थिक चणचण दूर करण्याची मागणी कर्नाटकसह अनेक राज्याने केंद्राकडे केली असून केंद्राने ती मान्य केली आहे.
जीएसटी भरपाई रक्कम आणि अन्य मदत देण्याचे केंद्राने आश्वासन दिले आहे, अशी माहिती देखील बोम्माई यांनी दिली. एकंदर कोरोना रोखण्यासाठी 30 जूनपर्यंत राज्यातील लॉक डाऊन वाढण्याचे संकेत गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिले आहेत.