कोरोनाग्रस्तांसह इतर रुग्णांवर उपचार करण्यात येत असलेल्या राज्यातील जिल्हा आणि तालुका हॉस्पिटलमधील आयसीयु तसेच इतर वॉर्डात आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार असून तसा असल्याचा आदेश राज्याच्या आरोग्य खात्याने काढला आहे.
येत्या दोन दिवसात राज्यातील सर्व जिल्हा व तालुका हॉस्पिटलमधील वार्ड आणि आयसीयु कक्षांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे निर्देश संबंधित हॉस्पिटल्सचे संचालक, वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा हॉस्पिटलचे मुख्य सर्जन व व्यवस्थापकीय संचालकांना देण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी येणारा खर्च आरोग्य सुरक्षा समितीच्या अनुदानातून किंवा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या इतर अनुदानातून करण्यात यावा, असेही सूचित करण्यात आले आहे. जिल्हा आणि तालुका हॉस्पिटलमध्ये कोरोना व इतर रुग्णांवर सुरू असलेल्या उपचारासंदर्भात अलीकडे तक्रारी वाढल्या आहेत. त्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन औषधे व इतर सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी होत आहेत. याची गांभीर्याने दखल घेऊन सरकारने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील चामराजनगर, गुलबर्गा, हुबळीसह विविध जिल्ह्यातील सरकारी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
मात्र ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे नव्हे तर इतर काही कारणांमुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा आरोग्य अधिकारी व सरकारने केला आहे. परंतु विरोधी पक्षांनी हा विषय उचलून धरून सरकारवर जोरदार हल्ला चढविल्यामुळे रुग्णांवर करण्यात येणारे उपचार, त्यांना देण्यात येणारी औषधे व इतर सुविधांवर लक्ष ठेवण्याचा निर्धार राज्य सरकारने केला आहे.