हॉटेल तिन्नीरी अँड टीन 53 च्या माध्यमातून आजच्या घडीला आम्ही दररोज सुमारे 450 कोरोनाग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या अटेंडर्सना तसेच गरजू लोकांना जेवणाची पाकिटे आणि पाण्याच्या बाटल्यांचे मोफत वितरण करीत आहोत. कोरोना प्रादुर्भाव काळात हॉस्पिटल व घरामधील गरजू कोरोनाग्रस्त रुग्ण आणि वयोवृद्धांचे पोटापाण्याचे हाल होऊ नयेत यासाठी आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे, अशी माहिती हॉटेल तिन्नीरी अँड टीन 53 तसेच विशाल कन्स्ट्रक्शनचे मालक विजय पाटील यांनी दिली.
सध्याच्या कोरोना प्रादुर्भाव आणि लॉकडाउनच्या प्रतिकूल परिस्थितीत विशाल कन्स्ट्रक्शनचे मालक विजय पाटील यांच्याकडून हॉटेल तिन्नीरी अँड टीन 53 च्या माध्यमातून मोफत भोजन वाटपाचा उपक्रम राबविला जात आहे. बेळगाव लाईव्हने विजय पाटील यांचे हे कार्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी वरीलप्रमाणे माहिती दिली.
ते म्हणाले की, जेंव्हा एक दिवस माझ्या लक्षात आले की हॉस्पिटलमधील कोरोनाग्रस्त रुग्णांचे जेवनखाणाचे हाल होत आहेत, तेंव्हा मी हा मोफत नाश्ता व जेवण वितरणाचा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कोरोनाग्रस्त रुग्णांसह त्यांचे नातलग त्याचप्रमाणे ज्या घरात स्वयंपाक बनवणे अशक्य आहे अशा लोकांपर्यंत नाश्ता व जेवणाची पाकिटे घरपोच पोचविण्याचे कार्य आम्ही करत आहोत.
सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्ण आणि त्यांच्या अटेंडर्सना आमच्याकडून सकाळच्या नाश्त्यातसह दुपार आणि रात्रीचे जेवण दिले जाते. गेल्या 17 दिवसांपासून हा उपक्रम सुरू असून नाश्ता आणि जेवणामध्ये दररोज कांहीतरी वेगळेपण असते. आठवड्यातील सातही दिवस वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता व भोजन गरजूंना दिले जाते, अशी माहितीही विजय पाटील यांनी दिली.
आमच्या या उपक्रमाला अनेक दानशूर लोकांची मदत मिळत आहे. आम्ही अपेक्षा ठेवली नव्हती परंतु हे लोक स्वतःहून चेक पाठवत आहेत किंवा ऑनलाईन पैसे पाठवत आहेत. याखेरीज रुग्ण देखील बरे झाल्यानंतर फुल ना फुलाची पाकळी म्हणून आमच्या स्वयंसेवकांकडे आर्थिक मदत देत देऊन आभार मानत आहेत. या उपक्रमात माझे सहकारी भगवान वाळवेकर आणि नागेंद्र प्रसाद यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
त्याचप्रमाणे अनेक स्वयंसेवक स्वतःहून या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन सर्वतोपरी मदत करत आहेत. आमच्या स्वयंसेवकांची 9 जणांची टीम असून हॉस्पिटल्सपर्यंत जाऊन कोरोनाग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या अटेंडर्सना तसेच घरोघरी जाऊन संबंधित गरजूंना जेवणाची पाकिटे पोहोचवण्याचे कार्य हे स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने हसत-खेळत करत आहेत, असे पाटील यांनी सांगितले.
आमच्या या मोफत नाश्ता व भोजन वाटप उपक्रमाचा आजचा अठरावा दिवस आहे. प्रारंभी 25 आणि आता 450 कोरोनाग्रस्त रुग्ण व त्यांच्या अटेंडर्सना आम्ही जेवणाची पाकिटे पुरवतो असे सांगून विजय पाटील यांनी ‘तिन्नीरी’ या आपल्या हॉटेलच्या नांवाचा अर्थ सांगितला. हा कन्नड शब्द असून मराठी त्याचा अर्थ ‘खा’ किंवा ‘जेवा’ असा होतो. आमच्या हॉटेलचे कुक हे दक्षिण भारतीय म्हैसूरचे असल्यामुळे त्यांच्या स्वयंपाकाला त्यांच्या भागातील स्वयंपाकाची कानडी चव असते यासाठी आम्ही आमच्या हॉटेलचे नांव ‘हॉटेल तिन्नीरी’ असे ठेवले असल्याचे स्पष्टीकरण विजय पाटील यांनी दिले.
पाटील यांचे सहकारी भगवान वाळवेकर म्हणाले की, आम्ही सामाजिक कार्य आणि सामाजिक संस्थांशी संलग्न असल्यामुळे खूप दिवसापासून या पद्धतीची जनसेवा करण्याची भावना आमच्या मनात होती. आता काळाची गरज लक्षात घेऊन ती भावना आम्ही प्रत्यक्षात उतरवली आहे. आमच्या या उपक्रमाला अनेकांचे सहकार्य लाभत आहे.
अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि आमचे कर्मचारी स्वयंस्फूर्तीने नाश्ता व जेवण गरजूंपर्यंत पोहचविण्याचे कार्य करीत आहेत. नाश्ता व जेवण मिळाल्यानंतर संबंधित लोक जे धन्यवाद देतात त्याची अनुभूती कांही वेगळीच असते असे सांगून यातून मानवियतेचा एक दुवा साधला जात आहे. तो एक वेगळ्याच पद्धतीचे समाधान देणार आहे, असे वाळवेकर यांनी सांगितले. हॉटेल तिन्नीरीचे तिसरे भागीदार नागेंद्र प्रसाद यांनी देखील मोफत नाश्ता व भोजन वाटपाच्या उपक्रमाबाबत थोडक्यात माहिती दिली.