कोरोना प्रादुर्भाव आणि सध्याची लाॅक डाऊन परिस्थिती लक्षात घेऊन फलोत्पादन खाते आणि जिल्हा हाफकॉम्स संस्थेतर्फे थेट शेतकऱ्यांकडून भाजी व फळे खरेदी करून ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोबाईल भाजी-फळे विक्री सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकार्यालय आवारामध्ये काल गुरुवारी या उपक्रमाचा शुभारंभ झाला.
फलोत्पादन खाते आणि जिल्हा हाफकॉम्स संस्थेच्या या घरपोच भाजी व फळे उपक्रमाचा शुभारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ उपस्थित होते. त्यांनी भाजी -फळे विक्री करणाऱ्या वाहनांना हिरवा झेंडा दाखवून उपक्रमाला चालना दिली.
लोकांनी या वाहनांमधुनच आवश्यक फळे व भाजीपाला खरेदी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी केले आहे. भाजीपाला आणि फळे खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी गर्दी होत असल्याने कोरोनाचा फैलाव वाढण्याची शक्यता आहे.
लोकांना अनेकदा आवाहन करूनही खरेदीसाठी बाजारात जाण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर आळा घालण्यासाठी तसेच सर्वसामान्यांना भाजीपाला घरपोच मिळावा या उद्देशाने या विशेष वाहनांची व्यवस्था करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी फलोत्पादन खात्याचे उपसंचालक रवींद्र हाकाटी, जिल्हा हाफकॉम्सचे अध्यक्ष बी. ए. होंगल, केएचएफचे संचालक वाय. एच. पाटील, हाफकॉम्सचे व्यवस्थापक बसनगौडा पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते.