गेल्या आठवड्यात झालेल्या पावसासह वादळी वाऱ्यामुळे बेळगाव जिल्ह्यात हेस्कॉमचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जोरदार वारा व पावसामुळे बेळगाव शहरात 12 ट्रान्सफॉर्मर निकामी झाले तर 12 हून अधिक वीज खांब कोसळण्याबरोबरच ठिकठिकाणी वीज वाहिन्या तुटून पडल्याच्या घटना घडल्या.
दरवर्षी वेगवेगळ्या कारणाने हेस्कॉमला मोठा फटका सहन करावा लागत आहे. गेल्या आठवड्यात अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते वादळाचा फटका हेस्काॅमला बसला आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वीजखांब आणि वीज वाहिन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शहरात झालेल्या नुकसानीनंतर हेस्कॉमने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले व वीजपुरवठा सुरळीत केला. मात्र ग्रामीण भागातील शिवारात पडलेले वीज खांब आणि वीजवाहिन्या जोडण्याचे काम अजून सुरू आहे. खानापूर तालुक्याच्या दुर्गम भागात अनेक ठिकाणी अद्यापही दुरुस्तीची कामे सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
एखादा वीज खांब मोडून पडला तर त्याचा पुन्हा कांही उपयोग करता येत नाही, त्यामुळे अधिक प्रमाणात नुकसान होते, अशी माहिती हेस्कॉमतर्फे देण्यात आली आहे. दरवर्षी वादळी वारा व पावसामुळे जिल्ह्याच्या विविध भागात वीज खांब कोसळण्यासह ट्रान्सफाॅर्मर खराब झाल्याने ते बदलण्यासाठी हेस्कॉमला मोठा खर्च करावा लागत असतो.
गेल्यावर्षी लाॅक डाऊन आणि कोरोनाच्या संकटामुळे विजेच्या मागणीत मोठी घट झाल्याने हेस्काॅमला आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. आता यावेळी तौक्ते वादळाचा फटका खानापूर व बेळगाव तालुक्यासह शहराला मोठ्या प्रमाणात बसला आहे.