कोरोना प्रादुर्भावाच्या आणि लाॅक डाऊनच्या काळात सेवाभावी संस्थांकडून गरीब गरजू लोकांना मोफत भोजन पुरवण्याचे उपक्रम राबविले जात आहेत. मात्र पिरनवाडी (ता. बेळगाव) येथील सकल मराठा समाज या मंडळाने गरीब गरजूंना मोफत भोजन देण्याबरोबरच सध्याच्या कोरोना काळात निधन पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना एक वेळचे भोजन देण्याचा उपक्रम राबवून आपले वेगळेपण दाखवून दिले आहे
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार माजविल्यामुळे सेवाभावी संस्था सर्वसामान्य जनतेच्या मदतीला धावू लागल्या आहेत. शहर परिसरात मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. एकाच कुटुंबातील अनेक जण कोरोनाचे बळी जात आहेत. दुःखाचा डोंगर कोसळलेल्या अशा कुटुंबातील सुतक लक्षात घेऊन पिरनवाडीच्या सकल मराठा समाज युवक मंडळाने गेल्या तीन-चार दिवसांपासून निधन पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना एक वेळचे भोजन पुरविण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
सदर मंडळातर्फे सोशल मीडिया तसेच वृत्तपत्रांमधील सहवेदना सदरातील निधन पावलेल्या व्यक्तींच्या बातम्या पाहून संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांसाठी एक वेळचे भोजन दिले जाते. गेल्या चार दिवसापासून सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत सध्या दररोज सुमारे 200 ते 250 जणांची भोजनाची व्यवस्था केली जात आहे.
सध्या स्वखर्चातून सकल मराठा समाज मंडळातर्फे हा उपक्रम राबविण्यात येत असला तरी हा उपक्रम मोठ्या प्रमाणात व सातत्याने राबविण्यासाठी मदतीची गरज आहे
तरी सदर उपक्रमास ज्या कोणाला मदत अथवा आर्थिक सहाय्य करावयाचे आहे, त्यांनी कृपया विनायक उसुलकर (9980374348), किरण नेसरकर (9632434594), नारायण मुचंडीकर (9741289806) किंवा नंदू नेसरकर (7795298113) यांच्याशी संपर्क साधावा असे, आवाहन करण्यात आले आहे.