कोरोना प्रादुर्भावामुळे मागील वर्षापासून शिवप्रेमी -शिवभक्तांना बेळगावच्या इतिहासिक शिवजयंती मिरवणुकीला मुकावे लागले आहे. मात्र कांगली गल्ली येथील एकता युवक मंडळाने मात्र प्राणवायू पर्यायाने झाडांचे महत्त्व विशद करणारा जीवंत देखावा सादर करून बेळगावातील शिवजयंती मिरवणुकीची परंपरा यावर्षी देखील जपली आहे.
परंपरेनुसार दरवर्षी बेळगावात वैशाख शुद्ध द्वितीयेला शिवजयंती मिरवणूक काढली जाते. मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षापासून बेळगावचे शिवभक्त या ऐतिहासिक चित्ररथ मिरवणुकीपासून वंचित राहिले आहेत. परंपरेनुसार शिवजयंतीच्या पहिल्या दिवशी पूजन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी मिरवणूक काढली जाते. म्हणजे त्यानुसार आज रात्री शहरात ही मिरवणूक असते. त्या अनुषंगाने बेळगावातील शिवजयंती मिरवणुकीची परंपरा टिकावी म्हणून कांगली गल्ली एकता युवक मंडळाने मागील वर्षापासून गल्ली पुरती मर्यादित शिवजयंती मिरवणूक काढण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.
मागील वर्षी या युवक मंडळाने आपण स्वतः पूर्ण बेळगाव शहर सॅनीटाइज केलं होतं तोच चित्ररथ देखावा सादर करत बेळगावची गल्ली मर्यादित शिव जयंतीची ऐतिहासिक मिरवणुकीची परंपरा जपली होती यावर्षी झाडे लावा झाडे जगवा ऑक्सिजन वाढवा हा संदेश देणारा देखावा सादर केला.
बेळगाव शहर सॅनीटाईझ करणाऱ्या एकता युवक मंडळाने सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन करत आज फक्त गल्ली पुरतीच मर्यादित शिवजयंती मिरवणूक काढली.
सदर मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज वनमहोत्सव करत आहेत, झाडे लावत आहेत. हा पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा देखावा सादर करण्यात आला होता. बेळगाव शहरात सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांना ऑक्सीजन अर्थात प्राणवायूची कमतरता भासत आहे. प्राणवायू हा झाडांमुळे निर्माण होतो. तेंव्हा झाडे लावणे ही काळाची गरज आहे. एकीकडे सरकार झाडे तोडत असले तरी मनुष्याला जिवंत राहण्यासाठी झाडांची पर्यायाने प्राणवायूची गरज आहे.
बेळगाव शहरात कॅंटोनमेंट हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे आणि हिरवळ आहे. मात्र शहराच्या उर्वरित भागात झाडांची संख्या कमी झाली आहे. ही हानी भरून काढण्यासाठी झाडे लावून वातावरणातील ऑक्सिजन वाढविणे आवश्यक आहे हे कांगली गल्लीच्या एकता युवक मंडळाने स्वतः छत्रपती शिवाजी महाराज झाडे लावत आहेत हा देखावा सादर करून सुचित केले आहे.