बेळगाव शहर व्याप्तीतील पिरनवाडी येथील एका बनावट डायग्नोस्टिक सेंटरवर धाड टाकून सीईएन पोलिसांनी कार गाडीसह 65 हून हजार रुपयांहून अधिक किंमतीचे साहित्य आणि रोख 24,000 रुपये जप्त केले असून याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
हसनसाब अब्दुलखादर सय्यद (वय 44, रा. निंगापूर गल्ली, खानापूर जि. बेळगाव) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव आहे. पिरनवाडी येथे बनावट डायग्नोस्टिक सेंटर सुरू करून खोटे लॅबरोटरी इन्वेस्टीगेशन रिपोर्ट आणि कोविड प्रोसेसिंग रिपोर्ट उपलब्ध करून देण्याद्वारे मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात होती.
याबाबतची खात्रीलायक माहिती मिळताच कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ विक्रम आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव शहर सीईएन पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने आज गुरुवारी संबंधित डायग्नोस्टिक सेंटरवर धाड टाकली. यावेळी पोलिसांनी हसनसाब याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने कोविड संदर्भातील बनावट रिपोर्ट बनवून देत असल्याचे मान्य केले.
या धाडीमध्ये बनावट लॅबरोटरी इन्वेस्टीगेशन रिपोर्टस् आणि कोविड प्रोसेसिंग रिपोर्टस्, 10000 रुपये किंमतीचा एक लॅपटॉप, 5000 रुपये किंमतीचा प्रिंटर, लेटर पॅडस्, खोटे स्टॅम्प, डिस्पो व्हॅन सिरिंज, डेंग्यू रॅपिड टेस्ट कार्ड्स, एसडी रॅपिड टेस्ट कार्ड्स आदी साहित्यासह इंडिका कार (क्र. एमएच 11 डब्ल्यू 3886) आणि डायग्नोस्टिक सेंटरमधील 24000 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
बेळगाव शहर सीईएन गुन्हे शाखा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपरोक्त धाडीची कारवाई केली. सदर कारवाई द्वारे बनावट डायग्नोस्टिक सेंटरचा पर्दाफाश केल्याबद्दल पोलीस आयुक्तांसह पोलीस उपायुक्त डाॅ. विक्रम आमटे यांनी गड्डेकर आणि त्यांच्या पथकाचे अभिनंदन केले असून शाब्बासकी दाखल त्यांना बक्षीस जाहीर केले आहे.