अतिवृष्टी यांचा सामना करण्यासाठी आवश्यक ती सर्व सिद्धता करा आणि पूरग्रस्तांचे पुनर्वसन करण्याबाबत विचार करा, अशी सूचना जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकारचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज शुक्रवारी झालेल्या जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकारच्या वार्षिक सभेत ते बोलत होते. यंदा पाऊस सर्व सामान्य असणार आहे. तथापि सर्व तयारी करणे हे आपले कर्तव्य आहे. हवामान खात्याने पावसाबाबत आपले अंदाज दिले आहेत. त्याला अनुसरून अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर सोपवलेल्या कर्तव्याची जबाबदारी पार पाडावी, असे ते म्हणाले. गेल्या दोन वर्षात आपत्कालीन परिस्थितीत सर्वांनी उत्तम कामगिरी बजावली आहे. यावर्षी सुद्धा त्याच दृष्टीने तयारी करायला हवी. आपत्ती निवारणाबाबतच्या सर्व सूचना आणि अंमलबजावणी तसेच अधिकाऱ्यांची कर्तव्य याबाबतचे बुकलेट तयार करून तेथे सर्व तालुक्यातील अधिकाऱ्यांना पाठवावे.
गतवर्षीप्रमाणे संबंधित सर्व ठिकाणी परिहार केंद्रांची निर्मिती करावी. बोटींची व्यवस्था करावी. नदी तीरावर असलेल्यांचे स्थलांतर आवश्यक असल्यामुळे परिवहन मंडळाला तशा सूचना दिल्या जाव्यात. जिल्ह्यात ज्या ठिकाणी बोटींची आवश्यकता आहे. त्याबाबतची माहिती प्राधिकारकडे द्यावी. आपत्ती निवारण करण्यामध्ये कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी सर्व तालुका आणि जिल्हा स्तरावर 24 तास कार्यरत असणाऱ्या कंट्रोल रूमची निर्मिती आवश्यक असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
तालुकास्तरावरील कंट्रोल रूम जिल्हास्तरावरील कंट्रोलशी संलग्न केल्या जाव्यात. तालुकास्तरावर तालुका अधिकाऱ्यांनी बैठका घेऊन कर्मचाऱ्यांना सर्व त्या सूचना कराव्यात. जनावरांसाठी चारा आवश्यक असून त्याची तयारी आत्तापासूनच करावी व जनावरांचे हाल होणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. आश्रय केंद्रात राहणाऱ्या कुटुंबांच्या जनावरांचे हाल होणार नाहीत त्यांनाही चाऱ्याची व्यवस्था होईल याकडे लक्ष द्यावे. फक्त नदीतीरावरीलच नव्हे तर शहरातील नाल्यांच्या स्वच्छतेवरही भर दिला जावा. पावसाळ्यात जा नाल्यांमुळे समस्या उद्भवतात त्याची स्वच्छता हाती घ्यावी अशी सूचना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केली.
जिल्ह्यातील तसेच बाजूच्या महाराष्ट्रातील सर्व जलाशयांच्या पाणी पातळीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे. अतिवृष्टी आणि पूर आपत्ती निवारण्या बरोबरच यंदा कोविडचे संकटही समोर आहे. कोविडच्या सर्व नियमांचे पालन केले जाईल, याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. पावसाळ्यात सातत्याने वीज पुरवठा खंडित होतो. झाडे कोसळतात आणि विद्युत पुरवठा खंडित होतो. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच या गोष्टी घडणार नाहीत याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. डी. यांनी केली.
याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुळगुंडी, पोलीस उपायुक्त डाॅ. विक्रम आमटे, चिकोडीचे उपविभागाधिकारी मुकेश कुमार यांच्यासह महानगरपालिकेचे आयुक्त जगदीश के. एच., पोलीस अग्निशामक, गृहरक्षक, आरोग्य पशुपालन अशा सर्व विभागाचे अधिकारी व आपत्ती निवारण समितीचे सदस्य उपस्थित होते.