कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी आरोग्य खाते आणि प्रशासनाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि विविध ठिकाणच्या अंगणवाडी केंद्रात मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र बहुतांश ठिकाणी लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी होत असल्यामुळे कोरोना नियमावलीचा फज्जा उडत आहे.
आरोग्य खाते आणि प्रशासनाकडून प्राथमिक आरोग्य केंद्र आणि विविध ठिकाणच्या अंगणवाडी केंद्रात मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र सध्या लसीचा तुटवडा जाणवू लागल्याने नागरिकांच्या रोषालाही त्यांना सामोरे जावे लागत आहे.
वडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही लसीकरण सुरू असून लसीकरण करून घेण्यासाठी केंद्रासमोर नागरिकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या गर्दीमुळे सामाजिक अंतराचा फज्जा उडत असून अन्य नियमांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता बळावली आहे.
गेल्या कांही दिवसांपासून कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे परिस्थिती बिकट बनत चालली आहे. लसीकरण करून घेण्यासाठी नागरिक सकाळी 6 -6:30 वाजल्यापासूनच प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर रांगा लावत आहेत. मात्र लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना निराश होऊन माघारी फिरावे लागत आहे. तीन-चार केंद्रासमोर थांबून देखील लस वेळेवर मिळत नसल्याने केंद्रातील परिचारिकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
वडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक लस उपलब्ध करून देण्याबरोबरच येथील होणारी गर्दी लक्षात घेता केंद्रामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात यावी अशी मागणी होत आहे. दरम्यान कोरोनामुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली असून रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. याचा परिणाम आरोग्य खात्यावर झाला असून आरोग्य खात्यातील डॉक्टर आणि परिचारिका तसेच अंगणवाडी व आशा कार्यकर्त्यांवरील ताण वाढला आहे.