कोरोनाचे संक्रमण वाढतच असल्याने रुग्ण संख्येचा रोज नवा विक्रम नोंदवला जात आहे. हॉस्पिटलमध्ये बेड मिळवण्यासाठी दमछाक होत असताना गंभीर रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध होणे दुरापास्त झाले आहे. अशी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असताना ग्रामीण भागात अद्यापही कोरोनाला गांभीर्याने घेतले जात नाही. लग्नाच्या नावाखाली हळदी आणि पूजेच्या जेवणावळी उदंड सुरू असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
शासनाने लग्न समारंभला केवळ 50 लोकांना परवानगी दिल्याने वधू-वर पक्षाने यातून पळवाट काढत हळदी आणि पूजेच्या जेवणावळीचा सपाटा लावला आहे. पत्रिका वाटप करताना लग्नाची अडचण सांगून हळदी किंव्हा पूजेचे आमंत्रण देण्यात येत आहे. वधूच्यावतीने केवळ हळदीला तर वराकडून हळदी किंव्हा पूजेच्या पर्याय देण्यात येत आहे. बहुतांश हळदीला तर मांसाहारावर भर देण्यात येत आहे. प्रथेच्या नावाखाली सुरू असलेले प्रकार थांबण्याची गरज असताना उलट याला चेव चढला आहे.
हळदीला पहाटेपर्यंत धांगडधिंगा सुरू आहे. तर पूजेलाही दुपारी आणि रात्रीही वर्दळ वाढली आहे. लग्नाची पळवाट काढत इतर कार्यक्रम जोरात करण्याचा सपाटा लावला आहे. “लग्नाला नेमक्या लोकांना न्या, हळदी-पूजा जोरात करा” असे अनाहूत सल्ले देणारे कोरोना वाढीला हातभार लावत आहेत, हे मात्र सोयीस्कर विसरत आहेत.
गावपातळीवर एकमेकांशी निकटचे संबंध असतात. ग्रामीण भागात लग्नाचे कार्यक्रम मिळून मिसळून करण्याची पद्धत आहे. त्यामुळे आताही असाच प्रकार बहुतांश ठिकाणी सुरू आहे. पण कोरोनामुळे सध्याची परिस्थिती विपरीत बनली आहे. आग्रहखातर जाणे भाग असले तरी प्रादुर्भाव होण्याचा धोका अधिक आहे. मास्क न वापराने, सामाजिक अंतर न पाळणे हे प्रकार गावपातळीवर होताना दिसत आहेत. त्यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका ग्रामीण भागात अधिक वाढला आहे. हा धोका टाळण्यासाठी जनतेने नियमांचे पालन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
वधू-वराच्या घरातील मंडळीनी आपल्या आनंदात इतरांना सामावून घेण्याचा अट्टाहास सोडून आपल्या घरापुरात लग्न समारंभ आटोपते घेण्याची गरज आहे. नाहीतर आणखी परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाचे गांभीर्य ओळखून पंच, गावपातळीवरील नेत्यांनी अश्या प्रकारांना खतपाणी घालण्याऐवजी अटकाव करण्याची गरज आहे.
कोरोनाचा धोका ओळखून बेळगुंदी, उचगाव, सांबरा या गावात निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. इतर ठिकाणीही कोरोना नियमांचे पालन होण्यासाठी पुढाकार देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.