कर्नाटक राज्यात येणाऱ्या आंतरराज्य प्रवाशांसाठी कोरोना चांचणीचे निगेटिव्ह प्रमाणपत्र अनिवार्य असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी शनिवारी दिली.
आम्ही फक्त प्रमुख रस्तेच बॅरिकेट्स घालून बंद केले नाही तर मागील वेळेप्रमाणे लहान -लहान रस्ते देखील बंद करण्यात आले आहेत. खास करून बेळगाव, बिदर, कलबुर्गी, बेंगलोर मधील अनीकल (तामिळनाडू सीमा) आणि मंगळूर (केरळ सीमा) आदी जिल्ह्यांच्या ठिकाणी असणाऱ्या आंतरराज्य सीमांवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत, असेही मंत्री बोम्मई यांनी सांगितले. केंद्राने सुचित केल्या प्रमाणे कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या आंतरराज्य प्रवाशांसाठी कोरोना चांचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट अर्थात प्रमाणपत्र सक्तीचे असणार आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील पोलीस खात्यासह सर्व जिल्हा प्रशासनांना लाॅक डाऊन लागू करण्याचा आदेश देण्यात आला आहे. जनतेने देखील लाॅक डाऊनचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, बेंगलोरचे पोलीस आयुक्त कमल पंत यांनी ट्विटरद्वारे लाॅक डाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करुन वाहने जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यात गेल्या 27 एप्रिलपासून निर्बंध लागू करण्यात आले असले तरी गेल्या 10 मेपासून दोन आठवड्यासाठी सदर निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. तथापि वाढत चाललेली कोरोनाग्रस्तांची संख्या आणि त्यामुळे हॉस्पिटल्स, डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफवर पडणारा ताण लक्षात घेऊन सरकारने हे निर्बंध आणखी दोन आठवड्यासाठी वाढविले आहेत. शनिवारी राज्यात नव्याने 32,218 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून सध्या राज्यभरात 5,14,238 ऍक्टिव्ह केसेस अर्थात सक्रिय रुग्ण आहेत.