रुग्णांवर त्यांच्या घरीच उपचार करून कोरोनाची साखळी तोडण्याची दूर देशीच्या इंग्लंड येथील डॉक्टरांची कोरोना विरुद्धची रणनीती गोकाक येथील डॉक्टरांच्या एका चमुने अवलंबिली असून त्याद्वारे आत्तापर्यंत शंभरहून अधिक रुग्णांना त्यांनी उपचार केले आहेत.
गोकाक सरकारी हॉस्पिटलमधील पेडिट्रिशियन डाॅ. जगदीश जिंगी यांच्या नेतृत्वाखालील डॉ. श्वेता पाटील, डॉ. ममता हडगीनाळ आणि गुरुसिद्धा आदी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश असणारा चमू गोकाक गावातील कोरोनाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर त्यांच्या घरी जाऊन उपचार करत आहेत. उपचाराची सदर पद्धत मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रसंगी इंग्लंडमध्ये अवलंबली जात होती.
हॉस्पिटल्सच्या बाबतीत बऱ्याचदा रुग्ण बरा होण्याऐवजी त्याला संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब ध्यानात घेऊन गेल्या वर्षी कोरोना काळात इंग्लंडमधील प्रशासनाने नवी पद्धत अवलंबताना वयोवृद्ध आणि असहाय्य व्यक्तींवर त्यांच्या घरीच उपचार करण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे सदर उपचारादरम्यान जर त्यांची प्रकृती चिंताजनक बनली तर त्यांच्यासाठी हॉस्पिटलमध्ये बेड राखीव ठेवले.
या उपचार पद्धतीची संपूर्ण माहिती घेऊन पेडिट्रिशियन डाॅ. जगदीश यांनी सध्याचा कोरोनाचा विस्फोट होण्यापूर्वीच गोकाकमध्ये घरी उपचाराची पद्धत अवलंबिण्यास सुरुवात केली आहे. यासाठी त्यांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या डॉ. श्वेता पाटील डॉ. ममता हडगीनाळ आणि हॉस्पिटलमधील परिचारिकांचा एक चमू तयार केला.
तसेच या चमूच्या सहाय्याने रुग्णांवर त्यांच्या घरीच उपचार करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी गोकाक गावातील 100 हून अधिक रुग्णांवर त्यांच्या घरीच उपचार केले आहेत. ही डॉक्टर मंडळी हॉस्पिटलमधील आपले काम संपल्यानंतर उर्वरित मोकळ्या वेळेत अथक घरोघरी जाऊन रुग्णांवर उपचार करण्याचे कार्य करतात, हे विशेष होय.