सध्या उत्तर कर्नाटकातील हुबळी शहरातील किम्स हॉस्पिटलमध्ये म्युकोरमायकाॅसिस अर्थात ब्लॅक फंगसचे सर्वाधिक 8 बळी गेले असून राज्यात आत्तापर्यंत 39 जणांचा या रोगामुळे मृत्यू झाला आहे.
राज्याच्या आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याने आपल्या वैद्यकीय प्रसिद्धीपत्रकात रविवारी पहिल्यांदाच ब्लॅक फंगसच्या बळींची नोंद घेतली आहे. आरोग्य खात्याच्या अहवालानुसार कर्नाटकात ब्लॅक फंगसचे 1250 रुग्ण आढळून आले असून यापैकी 1193 जणांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील सर्व 28 जिल्हा केंद्राच्या ठिकाणी हे उपचार सुरू आहेत.
बेंगलोर येथे सर्वाधिक 521 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 508 जणांवर उपचार सुरू असून 10 जण जीवघेण्या ब्लॅक फंगसवर मात करून बरे झाले आहेत, तर 3 जण मृत्युमुखी पडले आहेत. धारवाड जिल्ह्यात ब्लॅक फंगसचे 119 रुग्ण आढळून आले असून यापैकी 111 जणांवर हुबळीच्या किम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र या जिल्ह्यातील एकही रुग्ण अद्याप बरा झालेला नाही.
दरम्यान राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ब्लॅक फंगस रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बेळ्ळारी, चिक्कमंगळूर, चित्रदुर्ग, दावणगिरी, गदग, हावेरी, मंड्या, म्हैसूर, रामनगर, तुमकुर, उडपी, कारवार आणि विजयपुरा जिल्ह्यांमध्ये मात्र या घातक संसर्ग जन्य रोगामुळे अद्याप एकाचाही मृत्यू झालेला नाही.
राज्यात ब्लॅक फंगस मळे मृत्युमुखी पडलेल्यांची जिल्हावार आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. हुबळी -8 मृत्यू, कलबुर्गी आणि मंगळूर -प्रत्येकी 4 मृत्यू, बेंगलोर शहर व हासन -प्रत्येकी 3 मृत्यू, बेंगलोर ग्रामीण, कोलार व कोप्पळ -प्रत्येकी 2 मृत्यू, बागलकोट, बेळगाव, बिदर, चिक्कबेळ्ळापूर, रायचूर आणि यादगिरी प्रत्येकी 1 मृत्यू.