इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शसनेसचे संस्थापक आचार्य प. पु. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या पवित्र स्मृतीला वंदून इस्कॉन बेळगावतर्फे सध्याच्या कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या काळात कोवीड केअर सेंटर्सना सहकार्य करताना त्यांना मोफत प्रसाद अर्थात भोजन वितरण करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
कोरोनाची लक्षणे असणाऱ्या लोकांची काळजी घेणाऱ्या शहरातील कोवीड केअर सेंटर्सना सहकार्य करण्याच्या हेतूने इस्कॉनतर्फे मोफत प्रसाद अर्थात भोजन वितरणाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. भोजनाचा हा उपक्रम 20 हून अधिक लोकांसाठीच असणार आहे.
या भोजनामध्ये डाळ, भात, भाजी, खिचडी आदी पदार्थांचा समावेश असतो. संत मीरा, अनगोळ येथील कोवीड केअर सेंटर सध्या इस्कॉनच्या या उपक्रमाचा दररोज लाभ घेत आहे. या सेंटरचे कार्यकर्ते रिक्षा आदी वाहन घेऊन शुक्रवार पेठ येथील इस्कॉन मंदिराच्या स्वयंपाक घरातून भोजन घेऊन जातात असे इस्कॉनच्या नागेंद्र दास यांनी सांगितले.
मागील वर्षी कोरोना प्रादुर्भावाच्या पहिल्या लाटेप्रसंगी इस्कॉनतर्फे दररोज सुमारे 200 पोलीस कर्मचाऱ्यांना नाश्त्याचे वितरण करण्यात आले होते. आता यावेळी गरीब सर्वसामान्य नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या कोवीड केअर सेंटर्सना आपल्या परीने मदत करण्याच्या हेतूने इस्कॉनने हा मोफत प्रसाद अर्थात भोजन पुरवण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
सदर उपक्रमाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांनी 9241111710 अथवा 9632460111 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.