बेळगाव जिल्ह्यात आज शनिवारी नव्याने 1502 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यातील ऍक्टिव्ह केसेस अर्थात सक्रिय रुग्णांची संख्या 10,464 इतकी वाढली आहे.
बेळगाव जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशी 1500 हून अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे आज 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून ही मृतांची आत्तापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांचा एकूण आकडा 389 इतका झाला आहे.
आज निधन पावलेले सातही जण सारी रूग्ण असून त्यांचा ताप, खोकला आणि गुदमरल्यामुळे मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये 6 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. हे सर्वजण 34 ते 63 वर्षे वयोगटातील आहेत.
जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्या वाढली असून आज ती 10,464 इतकी झाली आहे. तसेच आज उपचारांती बरे झाल्यामुळे 614 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात काल शुक्रवारी 1592 तर आज शनिवारी 1502 अशा पद्धतीने सलग दोन दिवस पंधराशेहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान राज्यात आज शनिवारी नव्याने 41,664 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.