बेळगाव, बेंगलोर शहर आणि ग्रामीण यांच्यासह 8 जिल्ह्यांमधील कोरोना रिकव्हरी रेट अर्थात कोरोना मुक्त होणाऱ्यांचे प्रमाण राज्याच्या 80 टक्के सरासरीपेक्षाही कमी असून अलीकडेच या आठवड्यात नव्या पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत झालेली चिंताजनक वाढ हे यामागील कारण आहे.
दरम्यान, राज्यातील सर्वात कमी रिकव्हरी रेट बेळगाव जिल्ह्याचा 69 टक्के इतका असून जो 24 मे रोजी नोंदविला गेला आहे. त्याचप्रमाणे बेंगलोर ग्रामीण आणि शहराचा रिकव्हरी रेट अनुक्रमे 69.8 टक्के आणि 79 टक्के इतका आहे.
बिदर जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने कोरोनाग्रस्त बरे होत असून या ठिकाणचा रिकव्हरी रेट सर्वाधिक म्हणजे 95.4 टक्के इतका आहे. म्हैसूर आणि हासन जिल्ह्यामध्ये बाधितांच्या संख्येत वाढ होत असली तरी त्यांनी आपला रिकव्हरी रेट अनुक्रमे 86 टक्के आणि 80 टक्के इतका समाधानकारक ठेवला आहे.
राज्याच्या तांत्रिक सल्लागार समितीचे चेअरमन डाॅ. एम. के. सुदर्शन यांच्यामते कोरोना बाधित रुग्णांच्या झालेल्या उद्रेकामुळे रिकव्हरी रेट घसरला आहे. रिकव्हरी रेट हा अनेक बाबींवर अवलंबून असतो ज्यामध्ये सौम्य, मध्यम व गंभीर ही संसर्गाची लक्षणे, उपचारासाठी दाखल झालेली वेळ, उपचाराची पद्धत आणि डिस्चार्ज यांचा समावेश असतो असे त्यांनी सांगितले.
बेळगाव जिल्ह्यात गेल्या 24 मे रोजी नव्याने 17,441 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले होते. जिल्ह्यातील कोरोना बाधित यांची एकूण संख्या 57,846 होती, तर 39,940 जणांना डिस्चार्ज देण्यात आला होता. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत 459 जणांचा मृत्यू झाला आहे. रिकव्हरी रेट कमी होण्याचे कारण आठवड्यापूर्वी आढळून आलेले उच्चांकी पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ यांनी सांगितले.
गेल्या सात दिवसात 24 मेपर्यंत बेळगाव जिल्ह्यात नव्याने 7,159 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. मागील आठवड्यात जिल्ह्यातील दररोजचा पॉझिटिव्हीटी रेट 40 टक्के होता. मात्र आता तो 10 ते 12 टक्के आहे. सध्या आम्ही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि कोरोना चाचण्यांचा वेग वाढविला असून जास्तीत जास्त कोरोनाग्रस्त शोधून काढत आहोत, अशी माहितीही डॉ. मुन्याळ यांनी दिली.