शहरातील बहुतांश रस्त्यावर घालण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे रुग्णसेवेसह अन्य तातडीच्या सेवांमध्ये बाधा निर्माण येत असल्याने प्रमुख रस्त्यांवरील बॅरिकेड्स काढण्यात यावेत या आपल्या मागणीची महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने आज पुन्हा टिवीटद्वारे राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना आठवण करून दिली.
रस्त्यावर घालण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे रुग्णसेवेसह अन्य तातडीच्या सेवांमध्ये अडथळा निर्माण येत असल्याने मागच्या आठवड्यात कर्नाटक राज्याचे अतिरीक्त महासंचालक भास्कर राव यांनी बॅरिकेड्सबद्दल आवश्यक सूचना बेळगावच्या पोलीस आयुक्तांना दिल्या होत्या.
आयुक्तांनी देखील बॅरिकेड्सच्या ठिकाणी पोलिसांची नेमणूक करून अत्यावश्यक सेवेसाठी संबंधित मार्ग खुले केले जातील असे सांगितले होते. मात्र अद्यापपर्यंत प्रशासनाने बॅरिकेड्सबद्दल ठोस भूमिका घेतलेली नाही. ना पोलिसांची नेमणूक करण्यात आली ना बॅरिकेड्स हटविण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने आज परत भास्कर राव आणि बेळगाव प्रशासनाला बॅरिकेट्स काढण्याची आठवण करून दिली.
दरम्यान, गोगटे रेल्वे फ्लाय ओव्हर ब्रीजेचे रस्ते बॅरिकेड्स टाकून बंद करण्यात आल्यामुळे याठिकाणी आसपासच्या परिसरात असणाऱ्या हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकाना भोवाडा घालून रुग्णसेवा करावी लागत होती.
यासंदर्भात तक्रार करताच आज सकाळी या ठिकाणी पोलिसाची नियुक्ती करून एका बाजूचे बॅरिकेड्स हटविण्यात आले. दरम्यान स्थानिक अधिकाऱ्यांनी उद्यापासून रुग्ण सेवा तसेच तातडीच्या अन्य सेवांसाठी मार्ग खुले करून देण्याचे आश्वासन दिले आहे.