मंडोळी (ता. बेळगाव) गावच्या माळरानावर कित्येक वर्षे दुर्लक्षित अवस्थेत गंज खात पडून असलेल्या गोवा मुक्ती संग्रामातील रणगाड्यांना लष्कराकडून आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली असून त्याची छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. रंगरंगोटीमुळे संबंधित ऐतिहासिक रणगाड्यांना पुन्हा नवा लूक प्राप्त झाला आहे.
1961 सालच्या गोवा मुक्ती संग्रामातील लष्कराचे दोन रणगाडे मंडोळी गावच्या माळरानावर गेले कित्येक वर्षे एकाच ठिकाणी गंज खात पडून होते. माळरानावर दुर्लक्षित अवस्थेत पडून असलेल्या या रणगाड्यांच्या आडोशाचा प्रेमीयुगल आणि मद्यपी गैरफायदा घेत होते. एकेकाळी युद्धात शत्रूंच्या उरात धडकी भरवणाऱ्या या रणगाड्यांच्या आतील भागात शिरून मद्यपी मंडळी खुशाल ओल्या पार्ट्यांचे आयोजन करत होती. त्यामुळे त्या ठिकाणी केरकचरा आणि दारूच्या बाटल्यांसह गुटखा -सिगारेटीच्या पाकिटांचा खच पहावयास मिळत होता.
ग्रामीण भागातील एका युवकाने आपल्या मनोरंजनात्मक टिकटाॅक व्हिडिओद्वारे सोशल मीडियावर या रणगाड्यांकडे साऱ्यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर सहा महिन्यापूर्वी या रणगाड्यांच्या दुर्दशेबद्दल शहरातील कांही युवकांनी रॅप सॉंग बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल केले होते.
आता गोवा मुक्ती संग्रामातील माळरानावरील दोन्ही ठिकाणच्या या रणगाड्यांची दखल घेण्यात आली असून लष्कराकडून त्यांची आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे. रणगाड्यांच्या आजुबाजुचा परिसर स्वच्छ करण्यात आला असून त्यांच्या सभोवती माती टाकून विटा लावण्याद्वारे जमिनीलगत चौथरा निर्माण करण्यात आला आहे. लाॅक डाऊनमध्ये रणगाड्यांना करण्यात आलेल्या या रंगरंगोटीची छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.
त्यामुळे त्यांच्याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. लाॅक डाऊन शिथल झाल्यानंतर हे रणगाडे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. सदर ऐतिहासिक रणगाड्यांना आकर्षक रंगरंगोटी करण्यात आल्याने मंडोळी ग्रामस्थांसह देशभक्त नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहेत.