कोविडने मृत्यू झालेल्या अंगणवाडी कार्यकर्त्यांना नुकसान भरपाई द्यावी, सर्वेक्षणकर्त्या अंगणवाडी कार्यकर्त्यांना सुविधा आणि सुरक्षा पुरवावी आदी मागण्यांसाठी बेळगावात शुुक्रवारी अंगणवाडी कार्यकर्त्या रस्त्यावर उतरल्या.
या अंगणवाडी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरून निदर्शने केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन देण्यात आले.
कोरोनाने मयत झालेल्या अंगणवाडी कार्यकर्त्यांना भरपाई द्यावी, कोरोनाच्या कठीण काळात सेवा बजावणाऱ्या अंगणवाडी कार्यकर्त्यांना सुरक्षा उपकरणे आणि रक्षण द्यावे अशा अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या मागण्या आहेत. त्यांची पूर्तता करावी असा आग्रह करून अंगणवाडी कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी अंगणवाडी कार्यकर्त्यांनी विविध घोषणा दिल्या. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
अंगणवाडी कार्यकर्त्यांना कोविड सर्वेक्षण, लोकांचे आरोग्य रक्षण आदी कामे देण्यात आली आहेत. मात्र त्यांना कसलीच सुरक्षा देण्यात आलेली नाही. अंगणवाडी कार्यकर्तीचा कोविडने मृत्यू झाल्यास ३० लाख रुपये भरपाई देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र अद्याप एक रुपयाही दिलेला नाही. अंगणवाडी कार्यकर्त्यांचा त्याग सरकार विसरलं आहे असा आरोप तालुका अंगणवाडी कार्यकर्त्यां संघटना अध्यक्ष मंदा नेवगी यांनी केला.
बेळगाव तालुक्यातील चार अंगणवाडी कार्यकर्त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या कुटुंबियांनाही त्याचा संसर्ग झाला आहे. मात्र हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना उपचार घेणेही कठीण झाले आहे.
अंगणवाडी कार्यकर्त्यांना नियोजनबद्ध भरपाई, सुरक्षा द्यावी अन्यथा कामावर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.बेळगाव तालुका आणि जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या अंगणवाडी कार्यकर्त्यांनी या आंदोलनात भाग घेतला.