युवा समिती अध्यक्ष आणि म ए समितीचे अधिकृत उमेदवार शुभम शेळके यावेळची लोकसभा पोटनिवडणूक लढवीत आहेत. प्रत्येक गावा गावातील समिती नेते, कार्यकर्ते आणि मराठी माणसाला त्यांनी मला मतदान करा हे आव्हान केले आहे.
शुभम शेळके यांना पडणारे प्रत्येक मत हे सीमाभागातील मराठी माणसाची महाराष्ट्रात समाविष्ट होणारी लोकेच्छा दाखवणार आहे. ही लोकेच्छा मतांच्या रूपाने केंद्र सरकार समोर दाखविण्याची संधी शुभम यांच्या रूपाने सीमावासीयांना मिळाली आहे.
सीमावासीयांनी आपल्या मराठी उमेदवाराला पोट निवडणुकीत किती मते दिली हे नक्कीच केंद्र सरकार पाहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असोत त्यांचे बेळगाव पोट निवडणुकीकडे लक्ष आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन राष्ट्रीय पक्षांच्या विरोधात समितीचा सिंह उभा असल्याने नक्कीच ही निवडणूक फक्त कर्नाटक आणि महाराष्ट्र नव्हे तर देशात चर्चेची ठरली आहे. यामुळेच आता सीमावासीयांची जबाबदारी वाढली आहे.
शुभम शेळके यांना मिळणारा प्रतिसाद मिळता ते मराठी मताधिक्य सर्वाधिक घेणारे उमेदवार ठरतील यात शंका नाही. काहीजण भाजपचे नुकसान होईल आणि काँग्रेसला फायदा होईल असे बोलत आहेत तर अनेकांना आणखी काही बोलायचे आहे पण समितीच्या सिंहाला किती मते पडली याचा हिशोब सीमाभागातील किती जणांना महाराष्ट्रात जायचे आहे याच्याशी लावला जाणार आहे. शुभम यांना जितकी जास्त मते पडतील तितक्या जणांची लोकेच्छा दिसून येण्यासाठी आता जास्तीत जास्त मते पडण्याची गरज आहे.
यापूर्वी विधानसभा निवडणुकीतील पराभव हे मराठी माणसातील दुहीमुळे झाले आहेत. पण आता बेळगाव दक्षिण, ग्रामीण आणि बेळगाव उत्तर मतदारसंघातील लाखो मराठी माणसांना आपली ताकत दाखवून देण्यासाठी शुभम यांच्या रूपाने फक्त एकमेव उमेदवार लोकसभेसाठी लाभला आहे. राष्ट्रीय पक्षात काम करत असलेले मराठी कार्यकर्ते देखील आपली शक्ती शुभम यांच्या पाठीशी असल्याचे खासगीमध्ये सांगत आहेत.