Thursday, January 16, 2025

/

महिलांनी आघाडी उघडल्यामुळे शेळके यांचा विजय निश्‍चित : रूपाली चाखणकर

 belgaum

महिला या पुरुषांपेक्षा नेहमीच कणखर असतात. एखादा लढा हाती घेतला की तो यशस्वी केल्याशिवाय त्या गप्प बसत नाहीत. तेंव्हा शुभम शेळके यांना विजयी करण्यासाठी महिलांनी उघडलेली आघाडी निश्चितपणे यशस्वी होईल याची मला खात्री आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील राष्ट्रवादी महिला प्रदेश काँग्रेस अध्यक्षा रूपाली चाखणकर यांनी केले.

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे तडफदार उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारार्थ महिला आघाडीच्यावतीने आज गुरुवारी दुपारी आयोजित महिलांचा मेळावा उस्फुर्त प्रतिसादात पार पडला. या मेळाव्याप्रसंगी प्रमुख वक्त्या या नात्याने रूपाली चाखणकर बोलत होत्या. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात चाकणकर यांनी केंद्र आणि कर्नाटक राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षावर कडाडून टीका केली. देशात अच्छे दिन आणण्याऐवजी महागाईचा कळस गाठून भाजप सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल करून सोडले आहे. नागरिकांसाठी प्रारंभी जनधन योजनेचे पैसे घालणाऱ्या भाजप सरकारने तेच पैसे महागाई वाढवून दामदुपटीने पुन्हा वसूल केले आहेत. भारतीय जनता पक्ष कधीही मराठी माणसांच्या समर्थनात उभा राहिलेला नाही. भाजपच्या कारकिर्दीमध्ये मराठी जनतेवर अन्यायच झाला आहे. बेळगावात सुवर्ण विधानसौधची उभारणी, दोनदा बरखास्त झालेली बेळगाव महापालिका, महापालिका इमारतीचे स्थलांतर, अलीकडची महापालिके समोरील राष्ट्रध्वजाचा अवमान करणाऱ्या लाल -पिवळा झेंड्याची घटना आदी सर्व गोष्टी कर्नाटकात भाजप सरकार सत्तेवर असताना घडलेल्या आहेत, असे चाखणकर यांनी सांगितले.

राज्यातील सत्ताधारी भाजप सरकारने विकासाच्या बाबतीत बेळगावकडे दुर्लक्ष केले आहे. अलीकडच्या काळात शहरात जो विकास झाला आहे तो केंद्राने मंजूर केलेल्या 100 कोटी रुपयांच्या निधीतून झालेला आहे. यामध्ये राज्य सरकारचे कोणतेही योगदान नाही असे सांगून बेळगाव लोकसभा मतदार संघातील ही निवडणूक पोटनिवडणूक असली तरी तिला कमी न समजता सर्वांनी एकजुटीने आपली ताकद दाखवून शुभम शेळके यांना विजयी करताना विरोधकांना धूळ चारावी, असे आवाहन रूपाली चाखणकर यांनी केले.

याप्रसंगी व्यासपीठावर समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्यासह महिला आघाडीच्या अध्यक्षा माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, उपाध्यक्षा सुधा भातकांडे, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू मुतकेकर, मधुश्री पुजारी, जि. पं. सदस्य सरस्वती पाटील आदी उपस्थित होते. प्रारंभी रेणू किल्लेकर यांनी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले आपल्या प्रास्ताविकामध्ये रेणू किल्लेकर यांनी भाजप सरकारकडून बेळगाव शहरासह येथील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाची थोडक्यात माहिती देऊन शुभम शेळके यांना निवडून आणणे किती गरजेचे आहे हे स्पष्ट केले. त्यानंतर रूपाली चाखणकर यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.

महिला आघाडीच्या आजच्या या मेळाव्यास ताराराणी महिला मंडळ, महालक्ष्मी महिला मंडळ, यशोधरा महिला मंडळ, स्त्री शक्ती महिला मंडळ, कालिका देवी महिला मंडळ, मृत्युंजय महिला मंडळ, दुर्गादेवी महिला मंडळ, मराठा महिला मंडळ, जिजाऊ महिला मंडळ आदी बऱ्याच महिला मंडळांच्या पदाधिकारी व सदस्यांसह शेकडो महिला उपस्थित होत्या. त्यामुळे मराठा मंदिरचे सभागृह तुडुंब भरले होते. मेळाव्याचे सूत्रसंचालन माजी महापौर सरिता पाटील यांनी केले

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.