बंगळुरात कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. गेल्या 20 दिवसांपासून राज्यात आढळणार्या रुग्णसंख्येमध्ये 80 टक्के वाढ झाली आहे. बंगळूरमध्ये कोरोनाच्या दुसर्या लाटेचा सर्वाधिक वेग आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन ऐवजी नाईट कर्फ्यू लागू करण्यात येऊ शकतो अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली आहे. विधानसौधमध्ये रविवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.
कोरोनाच्या दुसर्या लाटेवर नियंत्रण मिळविण्यासाठी पहिल्या टप्प्यात 10 दिवस लॉकडाऊन करण्याचा सल्ला तज्ज्ञांच्या सल्लागार समितीने सरकारला दिला आहे. तज्ज्ञांनी कोरोना नियंत्रणाच्या उपाययोजनांबाबत सल्ला दिला. सुरुवातीला बंगळूरमध्ये लॉकडाऊन करता येईल. याचा परिणाम पाहून वाढत्या रुग्णसंख्येच्या परिसरात लॉकडाऊनचा विस्तार करता येईल, असे मत व्यक्त करण्यात आले.
लॉकडाऊन जारी केल्यास जनतेवर थेट परिणाम होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यास नकार दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लॉकडाऊनची गरज नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे याव्यतिरिक्त उपाययोजनांची अंमलबजावणी करता येईल, असे डॉ. सुधाकर यांनी तज्ज्ञांना सांगितले. यावर नियंत्रणासाठी लॉकडाऊन हाच पर्याय असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले; पण आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर यांनी लॉकडाऊन जारी करण्यास नकार दिला.
लॉकडाऊन करण्याची परवानगी मुख्यमंत्री बीएस येडियुराप्पा देणार नाहीत. आर्थिक चक्र थांबणारे कोणतेही निर्णय घेऊ नयेत, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्याचे डॉ. सुधाकर यांनी सांगितले. सध्या ८ शहरांमध्ये नाईट कर्फ्यू जारी केला आहे. त्याचे परिणाम पाहून आगामी काळात सर्वाधिक रुग्णसंख्या असणार्या ठिकाणी नाईट कर्फ्यूबाबत निर्णय घेता येईल. कंटेन्मेंट आणि मायक्रो कंटेन्मेंट झोनद्वारे कोरोनावर नियंत्रणाचा प्रयत्न करता येईल. कोरोना चाचणीचे प्रमाण ८० हजारवरून एक लाखावर नेण्याची सूचना डॉ. सुधाकर यांनी दिली.