कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी एपीएमसी होलसेल भाजी मार्केट सील डाऊन करण्यात आले आहे आणि तेथील अधिकृत व्यापाऱ्यांचा व्यापार संडे मार्केटच्या खुल्या जागेत स्थलांतरित करण्यात आला असल्याची माहिती बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) सचिवांनी दिली आहे.
एपीएमसी भाजी मार्केटमधील अधिकृत गाळेधारक व्यापाऱ्यांचा व्यापार संडे मार्केटच्या खुल्या जागेत स्थलांतरित करण्याबरोबरच व्यापाऱ्यांच्या विनंतीनुसार भाजी व्यापाराची वेळ बदलून सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त किरकोळ व्यवसायावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
तसेच एपीएमसी मार्केट यार्ड आवारात दुचाकी वाहने आणि ऑटोरिक्षांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. किरकोळ विक्रेत्यांना ओळखपत्र असेल तरच आवारात प्रवेश दिला जाणार आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या भादवि कलम 188 आणि कर्नाटक संसर्गजन्य रोग कायदा 2020 नुसार कारवाई केली जाईल, असेही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांनी आपल्या पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.