शैक्षणिक संस्था बंद करण्यासंदर्भात सरकारने लागू केलेल्या कोरोनासंदर्भातील नव्या मार्गदर्शक सूचीचे राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था विशेषत: विद्यापीठे पालन करताना दिसत नाहीत. राज्यातील बऱ्याच विद्यापीठांनी आपल्या (ऑफलाईन) परीक्षा आणि वर्ग पुढे ढकलले असले तरी कांही विद्यापीठांनी आपल्या परीक्षांचे वेळापत्रक (ऑफलाईन) जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या राज्यात नाईट कर्फ्यू आणि वीकेंड लॉक डाऊन जारी करण्याबरोबरच सरकारी वसतिगृहे, रेस्टॉरंट बंद करण्याबरोबरच बसमध्ये 50 टक्के आसनव्यवस्था आदी अन्य निर्बंध घालण्यात आले आहेत. ही वस्तुस्थिती असताना बेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापीठाने (आरसीयू) आपल्या 28 एप्रिलपासून सुरू होणार्या ऑफलाईन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे. राज्यभरात कोरोना विषाणूचा झपाट्याने प्रसार होत असताना आधीच विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाने (व्हीटीयु) राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आधीच संकटात टाकले आहे.
दुसरीकडे बेंगलोर विभागातील बहुतांश विद्यापीठांसह गुलबर्गा विद्यापीठ कर्नाटक विद्यापीठ धारवाड कायदा विद्यापीठ आदी विद्यापीठांनी यापूर्वीच 4 मेपर्यंत सर्व शैक्षणिक वर्ग आणि परीक्षा रद्द करण्याचा आदेश काढला आहे. कर्नाटक विद्यापीठाने आपल्या 21 एप्रिल रोजी काढलेल्या आदेशामध्ये सरकारच्या कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक सूचीनुसार विद्यापीठाच्या परिदृष्यात येणारे सर्व पदवी आणि इतर अभ्यासक्रमांचे वर्ग 21 एप्रिल ते 4 मे या कालावधीत बंद राहतील. मात्र ऑनलाइन / दूर अंतराचे शिक्षण सुरू राहील त्याला परवानगी आणि प्रोत्साहन असेल असे नमूद केले आहे.
बेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत. आता त्यांना परीक्षा द्यावयाची झाल्यास सरकारी अथवा खाजगी रेस्टॉरंट, बस सुविधा, राहण्याची सोय आदी सर्व गोष्टींची गरज आहे. सध्या कोरोनाची संसर्गजन्यता अतिशय वाढली असताना अशा परिस्थितीत विद्यार्थी घराबाहेर पडले तर संसर्गाचा धोका वाढणार आहे. तेंव्हा ऑफलाइन परीक्षा किंवा शैक्षणिक वर्ग आयोजित करणारी विद्यापीठे कोरोनापासून विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी घेणार आहेत का? असा सवाल पालक आणि खुद्द विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.