बेळगाव लोकसभा पोट निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत उद्या शनिवार दि. 3 एप्रिल 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे उद्या दुपारी 3 नंतर निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे चित्र विशेषत: मराठी भाषिक उमेदवाराचे चित्र स्पष्ट होणार आहे.
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया समाप्त झाल्यानंतर आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत उद्या शनिवारी दुपारी 3 वाजता समाप्त होणार आहे. ही मुदत संपल्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार आहेत आणि लढत नेमकी कशी होणार याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी मराठी भाषिकांचातर्फे दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे शुभम शेळके आणि शिवसेनेतर्फे के. जी. पाटील या दोघांचे हे अर्ज आहेत. युवा समितीतर्फे शुभम शेळके यांनी उमेदवारी दाखल केल्याचा अर्ज मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडे दिला आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेतर्फे के. जी. पाटील यांना बी फॉर्म मिळाला आहे. पाटील यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण या अधिकृत चिन्हावर अर्ज दाखल केला आहे. सीमाभागातील समस्त मराठी भाषिकांच्यावतीने या दोघांपैकी एका उमेदवाराला निवडणूक रिंगणात उतरविले जाणार आहे. हा उमेदवार कोण असेल या बाबतचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती घेणार आहे. आपला अंतिम निर्णय दोघांनाही मान्य करावा लागेल अशा आशयाचे पत्र समितीने यापूर्वीच उभय उमेदवारांना दिले असल्याचे कळते. त्यामुळे आता मध्यवर्ती म. ए. समितीच्या निर्णयावर सर्व कांही अवलंबून आहे.
दरम्यान मराठी भाषिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अधिकृत उमेदवारांची निवड करण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीचे बैठकांचे सत्र कालपासून सुरू झाल्याचे समजते. समितीच्या अंतिम निर्णयानंतर अधिकृत मराठीभाषिक उमेदवार कोण असेल हे स्पष्ट होणार असल्यामुळे बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांचे लक्ष या निर्णयाकडे लागून राहिले आहे.
मध्यवर्तीच्या निर्णयानंतरच मराठी भाषिक उमेदवाराच्या प्रचाराला वेग येणार आहे. दरम्यान शिवसेनेचे के. जी. पाटील आणि युवा समितीचे शुभम शेळके या दोघांपैकी एकाला उद्या आपला अर्ज मागे घ्यावा लागणार हे निश्चित असले तरी नेमकी कोणाला माघार घ्यावी लागणार हे उद्या शनिवारी दुपारी 3 नंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान अंतीम उमेदवार निवडीसंदर्भात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडून कमालीची गोपनीयता बाळगली जात आहे.