Friday, January 24, 2025

/

कोण होणार बेळगावच्या खासदारपदी विराजमान?

 belgaum

बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक पार पडली असून या निवडणुकीतील उमेदवारांचे भविष्य मत यंत्रात बंद झाले आहे. सध्या या मतदान यंत्रे स्ट्रॉंग रूम मध्ये दाखल झाल्या असून या रूमला पोलिसांचा कडेकोट पहारा आहे. येत्या २ मे रोजी या या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून शनिवारी मतदान पार पडल्यानंतर ८ विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन टिळकवाडीतील आरपीडी महाविद्यालयामध्ये ठेवण्यात आल्या आहेत.

मतदान घेण्यात आलेली मतदानयंत्रे शहरातील आरपीडी महाविद्यालयातील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आली असून यासाठी केंद्रीय सुरक्षा दलाचा सशस्त्र पहारा ठेवण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. के. हरीश कुमार, निवडणूक अधिकारी, राजकीय प्रतिनिधींच्या उपस्थितीत रविवारी सकाळी मतदान यंत्रे कक्षामध्ये ठेवून कक्ष सील करण्यात आला. हे सील आता 2 मे रोजी उघडण्यात येणार आहेत. या ठिकाणीच मतमोजणी पार पडणार आहे.

२ मे रोजी जाहीर होणाऱ्या निकालाच्या दिवसाची उमेदवारांसह संपूर्ण बेळगावकरांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. अत्यंत चुरशीने पार पडलेल्या या निवडणुकीत बेळगावच्या खासदारपदी कोणाची वर्णी लागणार याकडे साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी प्रत्येक पक्षाने जोरदार प्रचार केला असून शक्तिप्रदर्शनदेखील केले आहे. कोविड परिस्थितीत देखील कंबर कसून अनेक समर्थकांनी आपल्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे.

जिल्ह्यातील एकूण १८ लाख १३ हजार ५३८ मतदारांपैकी ९ लाख ७९ हजार ६९३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून यापैकी बेळगाव उत्तर मधील २४२६१८ मतदारांपैकी १०४०२५, बेळगाव दक्षिण मधील २४३०२७ पैकी १०८९६२ मतदारांनी बेळगाव ग्रामीण २४४०८४ पैकी १४२४५०, अरभावी २४००१२ पैकी १३२१६३, गोकाक २४९९९३ पैकी १५११७२, बैलहोंगल मधील १८९८५८ पैकी ११०११७, सौंदत्ती-यल्लम्मा १९७३८४ पैकी ११५८०१ आणि रामदुर्ग तालुक्यातील २०६५६२ पैकी ११५००३ अशा एकूण ९ लाख ७९ हजार ६९३ मतदारांनी मतदान केले आहे. या एकूण ८ मतदारसंघातील मतदान यंत्रे आरपीडी महाविद्यालयातील स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आली असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या मतपेट्या सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर असून, सध्या सुरक्षेसाठी पोलिसांचा ताफा या ठिकाणी तैनात राहणार आहे.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एक असे एकूण ८ कक्ष आहेत. प्रत्येक कक्षाबाहेर केंद्रीय सुरक्षा दलाचा सशस्त्र पहारा ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी ५८ सशस्त्र केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तैनात केले आहेत. शिवाय कक्षाबाहेरील इमारतीभोवती शेकडो पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिस उपअधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हा बंदोबस्त ठेवण्यात आला असून इमारतीभोवती सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले आहेत. यावर २४ तास पोलिस अधिकाऱ्यांचे निरीक्षण असणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.