बेळगाव महापालिकेच्या संभाव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग पुनर्रचनेचा फेरविचार केला जावा यासाठी माजी नगरसेवकांनी दाखल केलेल्या दाव्यासंदर्भात न्यायालयाच्या उन्हाळ्याच्या
सुट्टीला प्रारंभ होण्यापूर्वीच्या आजच्या या शेवटच्या दिवशी सुनावणी पूर्ण होऊ न शकल्यामुळे ती येत्या जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती खटल्यातील वादी माजी उपमहापौर ॲड. धनराज गवळी यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना दिली.
बेळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग पुनर्रचना आणि आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. कोणताही बदल न करता पुन्हा 2018 सालची वादग्रस्त प्रभाग पुनर्रचना जाहीर करण्यात आल्यामुळे त्याच्याविरोधात माजी नगरसेवकांनी कर्नाटक उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. मागील वेळी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठासमोर सरकारी वकिलांनी माजी नगरसेवकांनी दाखल केलेल्या दाव्यावर आक्षेप घेण्यासाठी दोन आठवड्याची मुदत मागितली होती. या कालावधीत प्रभाग आरक्षणाबाबत जारी होणारी अधिसूचना या बाबी लक्षात घेऊन न्यायाधीशांनी प्रारंभी दोन आठवड्यानंतर दाव्याची अंतिम सुनावणी करण्यात येईल असे सांगितले होते. पुढे न्यायालय सुरू झाल्यानंतर माजी नगरसेवकांनी दाखल केलेल्या दाव्यासंदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांच्या वकिलांनी कैफियत दाखल केली होती. त्यानंतर गेल्या 4 मार्च रोजी या दाव्याची सुनावणी होणार होती. तथापि सदर दावा न्यायालयासमोर वेळेवर न आल्यामुळे सुनावणी 23 मार्च त्यानंतर 5, 19, 22 व 23 एप्रिल अशी पुढे ढकलण्यात आली होती.
काल गुरुवारी 23 एप्रिल रोजी अंतिम सुनावणीसाठी सरकारी वकिलांनी वेळ मागून घेतल्यामुळे अंतीम सुनावणीची तारीख आज शुक्रवारी निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार न्यायालयीन कामकाज सुरु देखील करण्यात आले.
मात्र उद्यापासून न्यायालयाची उन्हाळ्याची सुट्टी सुरू होत असल्याने आजच्या शेवटच्या दिवशी अंतिम अंतिम सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही.
त्यामुळे न्यायालयाने येत्या जूनच्या पहिल्या आठवड्यात दाव्याची फुलफ्लेज अर्थात संपूर्ण अंतिम सुनावणी होईल, असे जाहीर केले. तसेच त्यावेळेपर्यंत महापालिकेच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होणे शक्य नाही. तथापि तशा हालचाली सुरू झाल्या तर उन्हाळी न्यायाधीशांसमोर (व्हेकेशन जज) आपण अपील करू शकतो. त्याविरुद्ध दाद मागू शकतो असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
दरम्यान, निवडणूक आयोगाचे ज्येष्ठ वकील ॲड. फनिंद्र यानी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्याला कोर्टाचे म्हंणणे मान्य असल्याचे सांगून जूनच्या पहिल्या आठवड्यात अंतिम सुनावणी झाल्यास आम्हाला देखील आमच्या कांही अतिरिक्त तक्रारी मांडता येतील, असे मत व्यक्त केले असल्याची माहिती माजी उपमहापौर ॲड. धनराज गवळी यांनी दिली.