टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो या निसर्गरम्य परिसराची शहराची ‘फुफ्फूस’ म्हणून ओळख आहे. मात्र ही ओळख आता पुसली जाणार की काय अशी भीती बेळगावकरांना वाटू लागली आहे. कारण येथील झाडांची वारंवार कत्तल करण्याबरोबरच आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कचरा टाकला जात आहे. ही बाब नुकतीच उघडकीस आली असून प्रशासन व आरोग्य खात्याने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर वैद्यकीय कचरा तात्काळ हटवावा, अशी मागणी हेल्प फॉर नीडी या संघटनेने केली जात आहे.
हेल्प फॉर निडीच्या माध्यमातून रविवारी व्हॅक्सिन डेपोमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. याप्रसंगी हेल्प फॉर नीडीचे प्रमुख सुरेंद्र अनगोळकर, संतोष दरेकर, वरूण कारखानीस, शिवानंद मेलगौडर आदी उपस्थित होते. या स्वच्छता मोहीमेप्रसंगी डेपो आवारातील आरोग्य खात्याच्या इमारतीला लागूनच मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कचरा आढळून आला. मुख्य वैद्यकीय इमारतीला लागून इतस्ततः विखरून पडलेल्या या कचऱ्यामध्ये कुलंट जेल बॅग, इंजेक्शन, औषधाची पाकिटे, कोव्हॅक्सिन संदर्भातील छोटी यंत्रे आदींचा समावेश आहे.
याबद्दल हेल्प फॉर नीडीचे प्रमुख सुरेंद्र अनगोळकर यांनी तीव्र नापसंती व्यक्त करताना खुद्द आरोग्य खात्यात जर या पद्धतीने बेजबाबदार वर्तन करत असेल तर सर्वसामान्य जनतेला दोष देण्यात काय अर्थ आहे? असा सवाल केला. हा वैद्यकीय कचरा आरोग्यासाठी धोकादायक असल्यामुळे आम्ही त्याला हात लावलेला नाही. व्हॅक्सिन डेपो परिसरात आबालवृद्ध सकाळी आणि सायंकाळी फिरावयास येत असतात. शुद्ध मोकळी हवा घेण्यासाठी या ठिकाणी येणाऱ्या या सर्वांसाठी हा वैद्यकीय कचरा धोकादायक ठरू शकतो ही साधी बाब या ठिकाणच्या आरोग्य खात्याला समजू नये ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे असे सांगून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन व्हॅक्सिन डेपो येथील या कचऱ्याची तात्काळ विल्हेवाट लावावी अशी मागणी सुरेन्द्र अनगोळकर यांनी केली.
व्हॅक्सिन डेपो परिसर हा घनदाट जंगल सदृश्य आहे. याठिकाणी सकाळी मॉर्निंग वॉकला तसेच सायंकाळी फिरायला येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. युवकांबरोबरच आबालवृद्ध व महिलाही या ठिकाणी फेरफटका मारावयास येतात. मात्र आता या वैद्यकीय कचऱ्यामुळे त्यांना नाहक त्रास होण्याची शक्यता आहे. सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कचरा टाकला जात असून अल्पावधीत हा निसर्गरम्य परिसर वैद्यकीय कचऱ्याचे आगर बनण्याचा धोका निर्माण झाला आहे.
व्हॅक्सिन डेपो येथे सध्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विकास कामे सुरू आहेत. तसेच त्यासाठी विनाकारण झाडांची कत्तल केली जात आहे. व्हॅक्सिन डेपो वाचविण्यासाठी विविध संघटनांच्या माध्यमातून यापूर्वी आंदोलनेही झालेली आहेत. आता पुन्हा आंदोलन होण्याआधी हा वैद्यकीय कचरा हटवावा. तसेच संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनीमधून होत आहे.