कोरोना प्रादुर्भावाच्या तीव्रतेने देशात नवी उंची गाठण्यास सुरुवात केली असून दररोज कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढती भर पडत आहे. परंतु नेमक्या याच वेळी बेळगाव जिल्ह्याला कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवड्याला तोंड द्यावे लागत आहे.
जिल्ह्यातील बहुतांश लसीकरण केंद्रे कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याने बंद पडली आहेत. यामध्ये सरकारी रुग्णालयातील केंद्रांचा आणि खासगी केंद्रांचा समावेश आहे. लसीसाठी पैसे आकारणाऱ्या खाजगी लसीकरण केंद्रांना एक दिवसाआड लस पुरवठा केला जात आहे. तथापि यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे. बराच काळ रांगेत ताटकळत उभे राहिल्यानंतर लसीचा स्टॉक संपल्याचे सांगण्यात येत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.
आज सकाळी मंडोळी रोडवरील द्वारकानगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी देखील हाच प्रकार घडला. तेंव्हा रांग लावून ताटकळत थांबलेल्या नागरिकांनी तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा जर स्टॉक संपला असेल तर तसा फलक केंद्रासमोर लावत चला जेणेकरून भल्या सकाळी येऊन रांगेत उभे राहणाऱ्या नागरिकांच्या वेळेचा अपव्यय होणार नाही, असे सुनावले. तसेच लस केव्हा येणार? अशी विचारणा केली असता संबंधित कर्मचाऱ्यांनी आम्हाला कांही माहीत नाही जेंव्हा येईल तेंव्हा आम्ही तुम्हाला ती देऊ असे बेजबाबदार उत्तर दिले. त्यामुळे आपापले फोन नंबर देऊन लस आली की आम्हाला फोन करा, असे सांगण्याची वेळ नागरिकांवर आली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉक्टरांचे नांव सांगण्यास देखील टाळाटाळ केली. दरम्यान खुद्द राज्याचे मुख्यमंत्री बेळगावात असताना देखील या पद्धतीने कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.