बेळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग पुनर्रचनेचा फेरविचार केला जावा यासाठी माजी नगरसेवकांनी दाखल केलेल्या दाव्यासंदर्भात आज गुरुवार दि. 22 एप्रिल रोजी होणारी अंतीम सुनावणी सरकारी वकिलांनी वेळ मागून घेतल्यामुळे उद्या शुक्रवार दि. 23 एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती खटल्यातील वादी माजी उपमहापौर ॲड. धनराज गवळी यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना दिली.
बेळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग पुनर्रचना आणि आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. कोणताही बदल न करता पुन्हा 2018 सालची वादग्रस्त प्रभाग पुनर्रचना जाहीर करण्यात आल्यामुळे त्याच्याविरोधात माजी नगरसेवकांनी कर्नाटक उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. मागील वेळी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठासमोर सरकारी वकिलांनी माजी नगरसेवकांनी दाखल केलेल्या दाव्यावर आक्षेप घेण्यासाठी दोन आठवड्याची मुदत मागितली होती. या कालावधीत प्रभाग आरक्षणाबाबत जारी होणारी अधिसूचना या बाबी लक्षात घेऊन न्यायाधीशांनी प्रारंभी दोन आठवड्यानंतर दाव्याची अंतिम सुनावणी करण्यात येईल असे सांगितले होते.
पुढे न्यायालय सुरू झाल्यानंतर माजी नगरसेवकांनी दाखल केलेल्या दाव्यासंदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांच्या वकिलांनी कैफियत दाखल केली होती. त्यानंतर गेल्या 4 मार्च रोजी या दाव्याची सुनावणी होणार होती. तथापि सदर दावा न्यायालयासमोर वेळेवर न आल्यामुळे सुनावणी 23 मार्च, 5 एप्रिल आणि त्यानंतर 19 एप्रिल रोजी मॅटर रिच न झाल्यामुळे सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली होती.
ती सुनावणी आज 22 एप्रिल रोजी होणार होती. परंतु अंतिम सुनावणीसाठी सरकारी वकिलांनी वेळ मागून घेतल्यामुळे सुनावणी आणखी एक दिवसासाठी म्हणजे उद्यापर्यंत लांबणीवर टाकण्यात आली असल्याची माहिती माजी उपमहापौर ॲड. धनराज गवळी यांनी दिली. तसेच परवापासून उन्हाळ्याची न्यायालयीन सुट्टी सुरू होणार असल्यामुळे उद्या 23 रोजी दाव्याची निश्चितपणे अंतिम सुनावणी होईल, असा आशावाद देखील ॲड. गवळी यांनी व्यक्त केला आहे.