सध्या सर्वत्र कोरोनाचा फैलाव वाढत चालल्याने बेळगाव जिल्ह्यातील सर्व धार्मिक कार्यक्रम यात्रांवर जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध घातले आहेत. जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार सोमवार दि. 19 एप्रिलपासून पुढील आदेश येईपर्यंत हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले उचगाव येथील ग्रामदेवता सुप्रसिद्ध श्री मळेकरणी देवी मंदिर दर्शन व यात्रेसाठी बंद करण्यात आले आहे.
देवस्थान कमिटी व समस्त देसाई भाऊबंद यांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच याची सर्व यात्रेकरू भाविकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे, असे कळविण्यात आले आहे. श्री मळेकरणी देवीची प्रत्येक मंगळवार व शुक्रवारी होणारी यात्रा कोरोनामुळे बंद ठेवण्याचा आदेश बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. तसेच या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यास सांगितले असून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी व ग्रामपंचायतीने दिला आहे. कोरोनाचा संसर्ग व प्रादुर्भाव वाढू नये यासाठी दक्षता म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी केली जात आहे.
कोरोना हा विषाणू संसर्गजन्य आहे. लोकांच्या सहवासातून तो जास्त लवकर पसरतो हे लक्षात घेऊन लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. उचगावमध्ये दर मंगळवार व शुक्रवार यात्रेनिमित्त हजारो भाविक येत असतात. मात्र आता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी काढलेल्या आदेशानुसार आणि लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने यात्रा बंद ठेवण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायतीने दिले आहे