बेळगाव जिल्हा लोकसभा पोटनिवडणूक १७ एप्रिल रोजी पार पडल्या. संपूर्ण जिल्ह्यात पोटनिवडणुकीसाठी सुमारे 55.61 टक्के मतदान झाले. दरम्यान रामदुर्ग तालुक्यातील दोन गावांनी मात्र मतदानावर बहिष्कार टाकला. हिरेतडसी आणि चिक्कतडसी अशी या गावांची नावे असून या दोन्ही गावातील मतदारांनी पूरग्रस्त भागाचे स्थलांतर न करण्यात आल्याने मतदानावर बहिष्कार घातला.
रामदुर्ग तालुक्यातील दोन गावांनी लोकसभा पोटनिवडणुकीवर शनिवारी बहिष्कार घातला. त्यामुळे या दोन्ही गावांतील मतदान केंद्रांकडे दिवसभर मतदार फिरकले नाहीत. पूरग्रस्त गावांचे स्थलांतर करा, असा आग्रह धरून रामदुर्ग तालुक्यातील हिरेतडसी आणि चिक्कतडसी या दोन्ही गावांनी मतदानावर बहिष्कार घातला.
मागणी पूर्ण होईपर्यंत मतदान करणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. दोन वर्षांपासून पूरग्रस्तांना शासनाने काहीही मदत केली नसल्याच्या निषेधार्थ आपण मतदानावर बहिष्कार घातल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दोन्ही गावामध्ये सुमारे अडीच हजार मतदार होते. यापूर्वी या दोन्ही गावांनी याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले होते, पण त्याची दखल न घेण्यात आल्याने अखेर निवडणुकीवर बहिष्कार घातला.
कोरोनामुळे अनेक ठिकाणी मतदारांचा उत्साह खूप कमी दिसून आला. एकूण मतदारांपैकी केवळ ५५.६१ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला.
कोरोनामुळे मतदानात 2019 च्या तुलनेत 12 टक्के घट झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. अशातच बेळगाव शहरामध्ये शहापूर मध्ये सकाळच्या सत्रात मतदान यंत्र बिघडल्याने मतदान प्रक्रिया ठप्प होती. तर रामदुर्ग तालुक्यातील या दोन गावातील मतदारांनी मतदानावरच बहिष्कार टाकला.