कर्नाटक राज्य परिवहन महामंडळच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून (7 एप्रिल) कर्नाटकात बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे राज्यातील बस सेवा ठप्प होणार आहे. परिवहन कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आणि सरकारी कर्मचारी म्हणून दर्जा मिळण्यासाठी हा संप पुकारण्यात आला असून केएसआरटीसी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु राहणार आहे.
केएसआरटीसी कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान बेळगावात बससेवा बंद राहणार आहेत. त्यामुळे टॅक्सी, मॅक्सी कॅब आणि खासगी बस आणि त्यांचे ऑपरेटर तैनात करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
परिवहन कर्मचाऱ्यांनी सहाव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्याची मागणी शासनाकडे केली आहे. परंतु कर्मचारी आंदोलनावर गेल्यास कर्मचाऱ्यांना आंदोलन काळातील वेतनास मुकावे लागेल, असा इशारा देत प्रसंगी एस्मा (एसेंशियल सर्व्हिस मेन्टनन्स एक्ट) लावण्याचाही विचार शासनाने सुरू केला आहे.
7 एप्रिलपासून विविध मागण्यांसाठी बेमुदत संप करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून खासगी बस, मॅक्सीकॅबला तात्पुरती परवानगी देण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. के. हरीश कुमार यांनी दिली. संपाच्यावेळी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेण्याचेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
परिवहन कर्मचारी संपावर गेले तर अन्य माध्यमातून परिवहन सेवा सुरु करण्याचा प्रयत्न आहे. तसेच गरज भासल्यास एस्मा कायद्याची अंमलबजावणी करण्याचीही तयारी ठेवली आहे. मात्र, कर्मचारी संघटना आपल्या भूमिकेवर ठाम असून 7 एप्रिलपूर्वी शासनाकडून सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यासंबंधी लेखी आश्वासन न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
हा संप झाल्यास सर्वांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. याला तोंड देण्यासाठी टॅक्सी, मॅक्सी कॅब आणि खासगी बसेसने तात्पुरते प्रवासी वाहतुकीचे परवानगी देण्यात येतील. यावेळी खासगी वाहनचालकांनी योग्य तेच प्रवासी भाडे घ्यावे. यामध्ये प्रवाशांची लूट दिसून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. परिवहन कर्मचाऱ्यांनीही सनदशीर मार्गाने आंदोलन करावे, खासगी वाहने रोखण्याचा प्रयत्न झाल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल.