सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतनवाढ करावी या मागणीसाठी कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आज 7 एप्रिलपासून पुन्हा बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे खाजगी प्रवासी वाहतूकदारांची फावले असले तरी प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय झाल्याचे चित्र बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकाच्या ठिकाणी पहावयास मिळाले.
परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे आज सकाळपासून बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकातील बस वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय झाली होती. अनेक जण बस स्थानकावर ताटकळत थांबलेले दिसत होते बस वाहक, चालक आदी सर्वजण संपावर गेल्याचा फायदा खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी उठवण्यास सुरुवात केली आहे. बससेवा बंद झाल्यामुळे बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकावर खाजगी प्रवासी वाहतूकदारानी जणू कब्जा मिळवला होता. बसस्थानक परिसरात सर्वत्र बस, मिनी बस, टेंपो, जीप आदी खाजगी प्रवासी वाहनांची गर्दी झाली होती.
प्रवाशांच्या असहाय्यतेचा फायदा उठवताना हे वाहतुकदार अव्वाच्या सव्वा प्रवास भाडे आकारून प्रवाशांची अक्षरशः लूट करताना पहावयास मिळत होते. आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी नेहमीची बस सेवा उपलब्ध नसल्यामुळे आधीच त्रस्त झालेल्या प्रवासी वर्गाची अवस्था खाजगी वाहतूकदारांच्या पिळवणूकीमुळे अधिकच केविलवाणी झाली होती.
परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल प्रत्येक जण तीव्र नाराजी व्यक्त करताना दिसत होता. दुसरीकडे या संपामुळे खासगी प्रवासी वाहतूकदारांची चांगलेच फावले असल्यामुळे त्यांनी आपले उखळ पांढरे करून घेण्यास सुरुवात केली आहे.
तरी प्रादेशिक परिवहन अधिकारी आरटीओ तसेच संबंधित अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून होणारी प्रवाशांची पिळवणूक थांबवावी अशी जोरदार मागणी केली जात आहे.