बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रामदुर्ग, बैलहोंगल आणि सवदत्ती येथे मंगळवारी (दि. ७) रोजी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार हजर होते.
यावेळी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली निवडणुकीची जबाबदारी समर्पकरीत्या पार पाडावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. निवडणुकीचे कार्य हे अत्यंत पवित्र असे कार्य आहे. शिवाय कायदेशीर आहे. हे कार्य निःपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी केले.
निवडणुकीसंदर्भात मतदान किंवा मतमोजणी प्रक्रियेसंदर्भात किंवा आता कोणत्याही पद्धतीचा गोंधळ, अथवा शंका असल्यास प्रशिक्षणादरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून शंकेचे निराकरण करून घेणे गरजेचे आहे.
मतदान आणि मतमोजणीसंदर्भात कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी सावधगिरी बाळगण्यात याव्यात. कोविड संदर्भातील मार्गसूचीचे तसेच निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
या प्रशिक्षण शिबिरात पी. आर. ओ., एपीआरओ, सहाय्यक निवडणूक अधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते.