दिवसेंदिवस राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने खबरदारीसाठी आगामी तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुका लांबणीवर पडणार आहेत, अशी माहिती ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री ईश्वराप्पा यांनी दिली.
लोकसभा पोटनिवडणुका झाल्यानंतर तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुका जाहीर होणार असल्याची माहिती देण्यात येत होती. या अनुषंगाने इच्छुकांनी निवडणुकीची तयारीही सुरु केली. राष्ट्रीय पंखांनी लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच लोकसभेसह तालुका पंचायत, जिल्हा पंचायत आणि महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने वाटचाल सुरु केली.
परंतु अचानकपणे तालुका आणि जिल्हा पंचायत निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.
तालुका आणि जिल्हा पंचायत सभागृहाची मुदत एप्रिल महिन्यात संपुष्टात येणार आहे. लोकसभा पोटनिवडणुकीनंतर तालुका आणि जिल्हा पंचायतीची निवडणूक लगबग सुरु होण्याच्या मार्गावर होती.
याच दृष्टीने इच्छुक उमेदवार आणि पक्षांनी रणनीतीही तयार केली होती. या सर्वांवर कोरोनाचे सावट आल्याने सदर निवडणूक पुढे ढकलण्यात येण्याची माहिती समोर आली असून अजून काही वेळ आता तयारीसाठी मिळणार आहे.