राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रमुख नेते राकेश टिकैत आहेत यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करीत असून संबंधित हल्लेखोरांना तात्काळ गजाआड करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कर्नाटक रयत संघासह विविध शेतकरी संघटनांनी मुख्यमंत्री बी. एस. यडीयुरप्पा यांच्याकडे केली आहे.
विविध शेतकरी संघटनांच्यावतीने कर्नाटक राज्य रयत संघाचे अध्यक्ष सिदगौडा मोदगी, शेतकरी नेते राजू मरवे आदींच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज शनिवारी सकाळी मुख्यमंत्र्यांकडे धाडण्यासाठी जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात आले. निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. राष्ट्रीय कृत किसान मोर्चाचे अध्यक्ष राकेश टिकैत यांच्यावर काल शुक्रवारी राजस्थान मधील एका गावामध्ये प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या अन्यायी कृषी कायद्या विरोधातील शेतकऱ्यांचा लढा मोडून काढण्यासाठी हा भ्याड हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करीत असून हल्लेखोरांना त्वरित गजाआड करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शेतकरी नेते आप्पासाहेब देसाई यांनी राष्ट्रीय किसान मोर्चाचे अध्यक्ष राकेश ठिकाणी त्यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर हे नथुराम गोडसे यांचे वंशज आहेत. तेंव्हा त्यांना ताबडतोब अटक करून कठोर शिक्षा द्यावी असे सांगून अन्यायी कृषी कायदे ताबडतोब रद्द करावेत अशी मागणी केली. बेळगावचे शेतकरी नेते राजू मरवे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना शेतकऱ्यांचे राष्ट्रीय नेते राकेश ठिकाणी त्यांच्यावर राजस्थानमध्ये जो जीवघेणा हल्ला झाला त्यामुळे फक्त भारतातीलच नाही तर जगातील शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे असे सांगितले.
भाजप सरकारच्या षडयंत्रामुळे शेतकरी भरडला जात असून हे अत्यंत निंदनीय आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करण्याचे हे सत्र ताबडतोब थांबविले जावे अन्यथा शेतकरी भाजप सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत असेही राजू मरवे यांनी स्पष्ट केले. आज सकाळी निवेदन सादर करतेवेळी प्रकाश नायक, जयश्री गुरण्णावर, बबन मालाई, अनिल अनगोळकर, भोमेश बिर्जे भैरू कंग्राळकर आदींसह बरेच शेतकरी उपस्थित होते.