गेल्या वर्षभरापासून कोविड रुग्णांच्या सेवेत असणाऱ्या केएलई इस्पितळातील कोविड सेंटरमधील एका ३७ वर्षीय परिचारिकेचा मृत्यू झाला आहे. सदर परिचारिका स्वॅब टेस्टिंग युनिटमध्ये कार्यरत होती. तिच्या कुटुंबामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. कोविड रुग्णांच्या सेवेत कार्यरत असणाऱ्या या कोरोना वारीयर परिचारिकेचा मृत्यू झाला आहे.
बेळगावमधील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याचप्रमाणे उपचाराअंती कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही योग्य प्रमाणात आहे. वाढत्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येमुळे राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.
नागरिकांच्या हितासाठी राज्य सरकारने नवी मार्गसूची जाहीर केली आहे. परंतु अजूनही नागरिकांमध्ये बेजबाबदारपणा दिसून येत आहे. काही प्रमाणात स्वयंप्रेरणेने नागरिक कोविड नियमांचे पालन करत आहेत. परंतु बाजारपेठ आणि इतर ठिकाणी खरेदीसाठी गर्दी करणाऱ्या नागरिकांचेही प्रमाण अधिक दिसून येत आहे. विनामास्क आणि सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडतानाही पाहायला मिळत आहे.
नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबियांच्या संरक्षणासाठी सरकारने जारी केलेल्या नियमांचे आणि मार्गसूचीचे पालन करणे अत्यावश्यक आहे.
या सर्व बंदोबस्तासाठी पोलीस आणि आरोग्य कर्मचारी तैनात आहेत. परंतु अनेक नागरिक विनाकारण यांच्याशी हुज्जत घालतानाही दिसत आहेत. सध्या कोरोनाचा विळखा अत्यंत घट्ट होत असून प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून स्वतःचे संरक्षण करणे, अनिवार्य आहे.