सुवर्णसौधसमोर होणारे आंदोलन, मोर्चे टाळण्यासाठी १० एप्रिलपासून ९ मेपर्यंत सुवर्णसौध परिसराच्या १ किलोमीटर पर्यंतच्या परिसरात जमावबंदी राहील, असा आदेश पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी बजावला आहे. सध्या लोकसभा पोटनिवडणुकीचे वातावरण आहे. १७ एप्रिल रोजी मतदान व त्यानंतर २ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. या काळात देखील या परिसरात कोणीही विजयोत्सव साजरा करू नये, याचाही विचार करून हा आदेश बजावला आहे, असे आदेशात म्हटले आहे.
सुवर्णसौध हिरेबागेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते. या ठिकाणी सध्या २४ शासकीय कार्यालये सुरू आहेत. येथे काही शासकीय बैठका होतात, शिवाय बंगळूरहन मंत्री आल्यानंतर अनेकदा ते येथेच अधिकाऱ्यांची बैठक घेतात.
नेमक्या याच काळात आपल्या मागण्या पुढे करत अनेक संघ, संस्था व राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते सुवर्णसौधसमोर धरणे धरत आहेत. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सुवर्णसौधसमोर धरणे धरल्यास अथवा येथे आंदोलन सुरू झाल्यास येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडचणी निर्माण होत आहेत.
येथे वाहनांची रांग लागल्यास बेळगावला मोठ्या रूग्णालयांकडे येणाऱ्या रूग्णवाहिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आयुक्तालयाने या इमारतीच्या पूर्ण परिसरापासून पश्चिम, दक्षिण व महामार्गाच्या बाजूला असलेल्या मुख्य प्रवेशाद्वाराच्या एक किलोमीटर परिघात जमावबंदीचा आदेश काढला आहे.