जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने जिल्ह्यात कोविड १९ मार्गसूची काटेकोरपणे पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मार्गसूचीतील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई करत दंड वसूल करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. के. हरीश यांनी दिला आहे.
तसेच पुन्हा पुन्हा कोविड मार्गसूचीचे उल्लंघन केल्यास आपत्ती निवारण कायद्यांतर्गत तक्रार दाखल करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन नव्या मार्गसूची जाहीर करण्यात आल्या आहेत. या मार्गसूचीचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणूक होणार आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये आचारसंहिता आणि कोविड मार्गसूचीनुसार प्रचाराला परवानगी देण्यात येत आहे. तथापि, अनेक ठिकाणी कोविड मार्गसूचीचे उल्लंघन होत असल्याची माहिती समोर येत आहे. कोविड संसर्ग कमी होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी जनतेच्या हितासाठीच आखून दिलेल्या नियमांचे पालन करणे हे जनतेचे कर्तव्य आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संसर्ग अधिक पसरण्याची शक्यता आहे.
नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे आढळ्यास संबंधित नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, शिवाय आपत्ती निवारण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. के. हरीश यांनी दिला आहे.