स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुरु असलेल्या कामकाजाचा सावळा गोंधळ संपता संपेना. दररोज एखाद्या तरी विभागातून स्मार्ट सिटी योजनेचे ओरभाडे निघत असून आज शहर आणि परिसरात झालेल्या वळिवानंतर स्मार्ट सिटीचे ओरभाडे निघाले आहेत.
शहापूर भागात गेल्या वर्षभरापासून विकासकामे राबविण्यात येत आहेत. नवीन रस्ते कामकाज सुरु आहे. दरम्यान गेल्या वर्षभरापासून मनपाने या भागातील गटारी स्वच्छ केल्या नाहीत. गटारीमध्ये कचरा साचल्यामुळे पावसाचे पाणी पुढे जाण्यास मार्ग न मिळाल्याने खडेबाजार शहापूर येथील कापड दुकानांमध्ये पाणी शिरले.
गटारी तुंबल्यामुळे याच भागात असणाऱ्या श्रीमती या कापड दुकानात पाणी आत शिरले. आणि पाहता पाहता गुडघाभर पाणी आत साचले. यामुळे या दुकानातील कपड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुरु असलेल्या कामांचा योग्य ताळमेळ आणि दर्जा नसल्यामुळे हा प्रसंग ओढवला असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत एसपीएम रोड, छत्रपती शिवाजी उद्यान आणि शहापूर तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. याठिकाणी असलेल्या नाल्यातील गाळ न काढल्यामुळे आणि गटारी स्वच्छ न केल्यामुळे या भागात पाणी साचले होते. पुन्हा असा प्रकार होऊ नये यासाठी लोकप्रतिनिधींनी या भागाचे सर्व्हेक्षण करून गाळ काढण्याची हमी दिली. परंतु पुन्हा हे काम थांबले आणि याचा फटका आजच्या पावसामुळे येथील नागरिक, दुकानदार आणि व्यावसायिकांना बसला आहे.
पहिल्याच पावसात या कामकाजाचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि मनपा प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन पावसाळ्यापूर्वी हा प्रश्न मार्गी लावावा तसेच कामात दिरंगाई आणि चुका केलेल्या अधिकाऱ्यांना दंडात्मक कार्रवाईसह कठोर शिक्षा देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.