बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकी संदर्भातील अवैध आर्थिक व्यवहार आणि मद्य पुरवठ्यावर करडी नजर ठेवण्यात येत असून त्या अनुषंगाने ठिकठिकाणच्या तपासणी नाक्यांवर आत्तापर्यंत एकूण 62.55 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. हरीशकुमार यांनी दिली आहे.
जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव लोकसभा मतदार संघाच्या व्याप्तीत 27 तपासणी नाके (चेकपोस्ट) स्थापण्यात आले आहेत.
या ठिकाणी निवडणुकीसंदर्भात वाहनांची तपासणी करताना आतापर्यंत एकूण 62,55,510 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पोलिसांसह इतर पथकाने केलेल्या चौकशीअंती जप्त केलेल्या पैशांपैकी 19,83,890 रुपये संबंधितांना परत करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे उर्वरित 42,71,620 रुपयांची संशयास्पद रोकड नियमानुसार अधिक चौकशीसाठी संबंधित खात्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
*4 हजार लिटर दारू जप्त*
दरम्यान, पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अबकारी खात्याने 11.25 लाख रुपयांहून अधिक किंमतीची 4,020 लिटर अवैध दारू जप्त केली आहे. अबकारी खात्याने अवैध दारूसह 16 मोटरसायकल्स, 1 कंटेनर, 1 टँकर, 4 कारगाड्या आणि 1 जीपगाडी जप्त केली आहे. या वाहनांची एकूण किंमत 42.26 लाख रुपये इतकी होते. निवडणूक कालावधीत अबकारी खात्याकडे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकूण 128 प्रकरणे दाखल झाली आहेत.