बेळगाव लोकसभा मतदार संघाची पहिली निवडणूक 1957 साली झाली त्याला आता 6 दशकं लोटली असून एखाद्या विद्यमान खासदाराचे निधन झाल्याने पोटनिवडणूक घेण्याची या मतदार संघाच्या बाबतीतील ही दुसरी वेळ आहे.
संसदेच्या खालच्या सभागृहात बेळगाव लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या आकस्मिक निधनामुळे या मतदारसंघाची पोटनिवडणूक घेणे गरजेचे झाले. त्यानुसार येत्या 17 एप्रिल रोजी बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक होणार आहे. अंगडी हे या मतदारसंघात 2019 साली खासदार म्हणून सलग चौथ्यांदा निवडून आले होते. सदर मतदारसंघाने 1957 पासून 2019 पर्यंत एकूण 17 निवडणुका पाहिल्या आहेत. बेळगाव लोकसभा मतदार संघाची पहिली पोट निवडणूक 1963 साली झाली, जेंव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उपगृह मंत्री बी. एन. दातार यांचे अकाली निधन झाले.
भाजपचे सुरेश अंगडी आणि काँग्रेसचे एस. बी. सिदनाळ या दोघांनी प्रत्येकी चार वेळा बेळगाव लोकसभा निवडणूक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. आजतागायत सार्वजनिक जीवनात या दोघांच्या या विक्रमाची बरोबरी कोणीही करू शकलेले नाही. त्याचप्रमाणे आतापर्यंत कोणतीही महिला उमेदवार या मतदारसंघात यशस्वी झालेली नाही. बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या विद्यमान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी नाही म्हंटले तरी 2014 साली निवडणूक लढवून संसदेत जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी त्यांना सुरेश अंगडी यांच्याविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता.
कै. सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी या यावेळी पहिल्यांदाच निवडणूक लढवीत आहेत. ही पोटनिवडणूक त्यांनी जिंकली तर या मतदार संघाच्या पहिल्या महिला खासदार होण्याचा मान मिळवून त्या एक नवा इतिहास निर्माण करू शकतील. यमकनमर्डी मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी हे विजयी झाले तर ते देखील या मतदार संघातील भाजपची गेल्या 25 वर्षातील विजयी परंपरा खंडित करून नवा इतिहास निर्माण करू शकतील. या मतदार संघाच्या निवडणुकीत इतिहासात विजय हा काँग्रेस आणि भाजप यांच्यात दोलायमान होत राहिला आहे.
बेळगाव लोकसभा मतदारसंघ हा 8 विधानसभा मतदारसंघांनी बनला आहे. यापैकी सहा मतदारसंघांमध्ये भगव्या पक्षाचे आमदार असून उर्वरित दोन मतदार संघामध्ये सतीश जारकीहोळी यांच्यासह काँग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळे मतदारांना आपल्याकडे वळविणे भाजपसाठी फारशी अवघड गोष्ट नाही. असो, एकंदर आता जो कोणी उमेदवार विजय होईल त्याला या मतदारसंघाचे 3 वर्षे प्रतिनिधित्व करावयास मिळणार आहे.