रमेश जारकीहोळी सीडी प्रकरण दिवसेंदिवस नवी वळणे घेत असून सध्या माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांना कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे गोकाकमध्ये रमेश जारकीहोळी यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ज्या रुग्णालयात रमेश जारकीहोळी यांना दाखल करण्यात आले आहे, त्या रुग्णालयात आज एसआयटी पथकाने भेट दिली. यामुळे राजकीय वर्तुळात आज हा चर्चेचा विषय बनला आहे.
माजी मंत्री आणि गोकाकचे विद्यमान आमदार रमेश जारकीहोळींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे उघडकीस आल्यानंतर एसआयटीच्या अधिकार्यांनी थेट रुग्णालयाला भेट दिली आहे. एसआयटी इन्स्पेक्टरांच्या पथकाने डॉक्टरांकडून माहिती गोळा करण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुका रुग्णालयात भेट दिली.
मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र यांच्याकडे केलेली चौकशी….? रमेश जारकीहोळींचा कोरोना अहवाल सकारात्मक कधी आला? आता आरोग्याची स्थिती कशी आहे? अजून किती दिवस इस्पितळात रहावे लागणार? यासह डॉक्टरांना अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. सदर चौकशी दीड तासापेक्षा जास्त काळ अधिकाऱ्यांनी रमेश जारकीहोळी यांच्या तब्येतीसंदर्भात डॉक्टरांशी चर्चा केली.
सीडी प्रकरणी पुन्हा नवे वळण लागले असतानाच अचानकपणे रमेश जारकीहोळी यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने यासंदर्भातही उलट सुलट चर्चा रंगताना दिसत आहेत. चौकशीआधीच तब्येत बिघडल्याने ते चौकशीसाठीही हजर राहू शकले नाहीत.
दरम्यान त्यांची तब्येत तपासली असता त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु निपक्षपातीपणाने कार्य करणाऱ्या एसआयटी पथकाने रमेश जारकीहोळी यांची पाठ न सोडता थेट रुग्णालयात जाऊन चौकशी केल्याने याप्रकरणी पुढे काय होईल? याची उत्सुकता साऱ्यांना लागली आहे.