निवडणूक म्हटलं कि, अनेक पक्ष पैसे देऊन मते विकत घेतात. हा प्रकार साऱ्यांनाच अवगत आहे. परंतु उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून उमेदवाराला पाठबळ देणे हे कौतुकास्पद आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार शुभम शेळके यांना गाव, शहर, तालुका आणि जिल्हाच नाही तर थेट अमेरिकेतून पाठिंबा मिळाला आहे. अमेरिकेतील प्रवीण म्हापसेकर (कॅलिफोर्निया ,अमेरिका) यांनी शुभम शेळकेंना ५१ हजारांची देणगी दिली आहे. शिवाय या निवडणुकीत विजयी होण्यासाठी आशीर्वाद देखील दिले आहेत.
शुभम शेळके यांना तालुक्यातून मिळालेल्या पाठिंब्यानंतर आज शहरातील गल्लोगल्लींमधुनही पाठिंबा मिळाला. ज्या ज्या ठिकाणी शुभम शेळके प्रचारासाठी गेले, त्या त्या ठिकाणी शुभम शेळके यांचे जंगी स्वागत करण्यात आले. सीमाभागातील मराठी भाषिकांनी दाखविलेल्या या एकजुटीमुळे राष्ट्रीय पक्षांची भंबेरी उडाली आहे. राष्ट्रीय पक्ष पैसे देऊन मते खरेदी करतात, हे सर्वश्रुत आहे. परंतु मराठी अस्मिता राखण्यासाठी आणि मराठी अस्मितेला जपण्यासाठी स्वतःच मतदार उमेदवाराला आर्थिक मदत करत आहेत, हि अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे. बेळगाव लोसभा पोटनिवडणूक वाढविणारे शुभम शेळके हे अवघ्या २६ वर्षांचे आहेत. परंतु मराठी भाषिकांसाठी त्यांनी दाखविलेल्या करारी बाण्यामुळे सीमाभागातील सर्व मराठी जनता पुन्हा एकदा एकवटली आहे.
भाजपच्या मंगला अंगडी आणि काँग्रेसचे सतीश जारकीहोळी हे दोन्ही उमेदवार जरी राजकीय वर्तुळातील असले तरी शुभम शेळके यांच्या निवडणुकीत उतरण्याने आणि त्यांच्या प्रचार सभांमुळे राष्ट्रीय पक्षांना धडकी भरली आहे.
ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असून मराठी मतदारांसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार पर्याय ठरु शकतो, असे मानले जात आहे. यामुळेच राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांपुढे समितीच्या उमेदवाराचे तगडे आव्हान आहे. समितीने या निवडणुकीत युवा नेतृत्वाला संधी दिली असून निवडणुकीबाबत उत्सुकता वाढली आहे.