बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांना दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत आहे. यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे मराठी भाषिक तरुण मोठ्या संख्येने शुभम शेळके यांच्या पाठीशी उभे राहिलेले दिसून येत आहेत. विशेष म्हणजे शहर व उपनगरातील युवक मंडळाच्या गल्लोगल्लीत असणाऱ्या सूचना फलकांवर शुभम शेळके यांना जाहिर पाठिंबा देऊन युवा वर्गासह मराठी भाषिकांनी आपण पाठीशी आहोत हे स्पष्ट केले आहे.
मराठी भाषिकांना फक्त स्वार्था पुरते जवळ करणाऱ्या अन्य पक्षाच्या नेत्यांनी आपल्या गल्लीत फिरकू नये असा सज्जड दमही कांही फलकाद्वारे येते भरण्यात आल्याचे दिसून येते. क्रांतिसिंह नाना पाटील चौक चव्हाट गल्ली बेळगाव येथील फलकावर शुभम शेळके यांना जाहीर पाठींबा व्यक्त करण्यात आला आहे. पाटील गल्ली येथील शिवराय युवक मंडळ, बसवन कुडची येथील जय शिवाजी युवक मंडळ व श्री कलमेश्वर युवक मंडळ, बापट गल्ली येथील श्री कालिका देवी युवक मंडळ, छत्रपती शिवाजी चौक मित्र प्रेम युवक मंडळ, वायुपुत्र सेना मंडळ वायुपुत्र सेना व पंच कमिटी नवी गल्ली शहापूर, श्री सिद्धिविनायक युवक मंडळ, शहापूर कोरे गल्ली येथील सन्मित्र युवक मंडळ, पिरनवाडी येथील श्री गणेश मंदिर कमिटी, किणये येथील युवक मंडळ सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ मार्केट यार्ड, श्री समर्थ युवक मंडळ, श्री महालक्ष्मी युवक मंडळ, स्वराज्य मित्र मंडळ आदींच्या सूचना फलकांवर शुभम शेळके यांना जाहिर पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे.
गोवावेस राजा या मंडळाच्या फलकावर सूचक 9 क्रमांक आणि सिंहाचे चित्र दाखवून सिंहाची धडपड थेट दिल्लीवर असा मजकूर लिहिण्यात आला आहे. किणये येथील युवक मंडळाच्या फलकावर भगव्या झेंड्याला, मराठी वाघाला जाहीर पाठिंबा, सिंह अधिक समिती अधिक शेळके असे लिहिण्यात आले आहे. कांही ठिकाणच्या फलकांवर तर राष्ट्रीय पक्षांनी मते मागण्यासाठी येऊ नये असा सज्जड दम देखील भरण्यात आला आहे. दरम्यान, मराठी भाषिकांचे वास्तव्य असणाऱ्या बहुसंख्य परिसरातील युवक मंडळ आणि तसेच गल्लीतील पंचानी शुभम शेळके यांना पाठिंबा दिल्याने शेळके यांच्या विजयाची शक्यता वाढली असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.